स्नेहा मोरेमुंबई : बदलती जीवनशैली, जंकफूड या सर्व प्रकारामुळेच चरबी वाढते आणि लठ्ठपणाची समस्याही भेडसावेत. हेच झोपमोड म्हणजेच, ‘निद्रानाश’ होण्याचे मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. कूपर रुग्णालयात निद्रा तपासणी विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाप्रमाणे याच कारणांमुळे अधिकाधिक निद्राविकार होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या बदलत्या गतिमान राहणीमानामुळे अधिकाधिक लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत असल्याचे समोर आले आहे.विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात मार्च २०१७ मध्ये हा विभाग सुरू झाला. या विभागांतर्गत ‘स्लीप टेस्ट’ सुुरू करण्यात आली. या विभागांतर्गत केवळ १० रुपयांचा केसपेपर काढून रुग्णांच्या निद्रानाशाचे प्रमुख कारण असलेल्या श्वसनाच्या अडथळ्यांवर उपचार केले जातात. कूपर रुग्णालयात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तिन्ही दिवशी रुग्णाची साधारण तपासणी केल्यानंतर, त्याला झोपेच्या तपासणीची आवश्यकता वाटल्यास, सायंकाळी ७च्या सुमारास या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते.त्यानंतर, रुग्णाचे वजन, शरीर द्रव्यमान निर्देशांक (बीएमआय), उंची मोजली जाते. मग रुग्णाच्या नाकाला नलिका जोडल्या जातात. छातीला आणि हाताच्या बोटांना पल्सोमीटर जोडले जाते. ही यंत्रे संगणकाला जोडून, त्यावरील ‘पॉलिसोमिनोग्राफी’ या सॉफ्टवेअरच्या साह्याने संबंधित रुग्णाच्या झोपेचा अभ्यास केला जातो. साधारण रात्री ९ वाजता ही यंत्रे लावली जातात. रात्रभर झोपेदरम्यान रुग्णाला किती वेळा जाग आली, याची पाहणी केली जाते, अशी माहिती नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शशिकांत म्हसळ यांनी दिली. २०पेक्षा अधिक वेळा झोपमोड झाली असल्यास, त्याची ‘एंडोस्कोपी’ केली जाते. यामध्ये रुग्णाला इंजेक्शन देऊन झोपविले जाते. त्यानंतर, नाकातून दुर्बीण टाकून अंतर्गत भागाची तपासणी केली जाते. त्यातून झोपेस अडथळा ठरणारा भाग शोधला जातो व त्याआधारे रुग्णाला वैद्यकीय सल्ला दिला जातो.लवकरच विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू होणारलवकरच या रुग्णालयात निद्राविकार तपासणी विभागाकरिता नवा बाह्यरुग्ण कक्ष सुरू होणार आहे. या बाह्यरुग्ण कक्षात केवळ निद्राविकार रुग्णांची तपासणी करण्यात येईल. हा कक्ष नव्या वर्षात सुरू होईल.जंकफूडमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, यामुळे बºयाचदा श्वसनास त्रास होतो. श्वसनास त्रास होत असल्याने झोपमोड होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे तपासणीसाठी येणाºया ७०हून अधिक रुग्णांना जंकफूड आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निद्राविकार झाल्याचे दिसून आले आहे, तर अन्य रुग्णांच्या झोपमोडीची कारणे ही सोशल मीडिया, स्मार्टफोन्सचा वापर, ध्रूमपान आणि मद्यपान अशी आहेत.६० हून अधिक जणांची चाचणी‘स्लीप आॅप्निया’ टेस्टसाठी रुग्णाला ८ तास या बेडवर झोपविले जाते. त्याचे डोके, छाती, चेहरा आणि हातांवर इलेक्ट्रिकल स्ट्रिप्स लावल्या जातात. यानुसार, रुग्णाच्या हृदयाची हालचाल, रक्तदाब, स्नायूंची हालचाल याचे रेकॉर्डिंग या चाचणीत केले जाते. यामुळे दुसºयाच दिवशी रुग्णाला आपल्या निद्रानाशाचे नेमके कारण कळते.आतापर्यंत कूपर रुग्णालयात ६० हून अधिक जणांची चाचणी करण्यात आली असून, यापैकी बहुतेकांना स्थूलत्वामुळे श्वसनाच्या होणाºया त्रासाने झोपमोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णालयात तपासणीसाठी येणाºया रुग्णांचा वयोगट ३० ते ५० हा आहे.गेल्या काही वर्षांत केवळ मुंबईच नव्हे तर देशभरातील मेट्रोसिटीमधील लोकांची जीवनशैली बदलली आहे. परिणामी, बºयाच जणांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे टाळण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे मेट्रो शहरांतील लोकांनी विशेषत: लहानग्यांकडेही लक्ष द्यावे, जेणेकरून त्यांच्या सवयी आणि आहाराचा योग्य समतोल निरोगी आयुष्य देऊ शकेल.- डॉ. क्षितिजा रणदिवे, फिजिशिअनझोप न लागणे आणि झोपमोड होणे या दोन भिन्न समस्या आहेत. त्यांची कारणे शोधून त्यांचे निराकरण करण्यासाठी स्लीप टेस्टसारख्या तपासण्या उपयुक्त ठरतात. त्यामुळे अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करणे टाळावे. तसेच स्मार्र्टफोन्स, सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्याच्या वापरावर नियंत्रण आणावे, जेणेकरून यामुळे झोपमोड होणार नाही. तसेच जंकफूड खाणे टाळावे कारण यात शरीराला हानिकारक पदार्थांचा समावेश असतो. यांच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवतात. याच प्राथमिक टप्प्यातील तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळे आहार, योग्य पोषण याकडे लक्ष द्यावे.- डॉ. सौम्या गुप्ता, आहारतज्ज्ञ
मुंबईकरांची झोप उडाली, बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:51 AM