Join us

एसी, फॅन बंद करून मुंबईकर झोपले! मुंबईत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 9:43 AM

थंडी वाढल्याने वातावरण कूल करणाऱ्या विजेच्या उपकरणांचा वापरही कमी झाला आहे.

मुंबई : मुंबईत दररोज विजेची मागणी ३४०० ते ३८०० मेगावॅट नोंदविण्यात येते. आता थंडी वाढल्याने वातावरण कूल करणाऱ्या विजेच्या उपकरणांचा वापरही कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत घट झाली आहे. बुधवारी विजेची मागणी २ हजार ९०० मेगावॅट होती. ११ आणि १२ जानेवारी रोजी विजेची मागणी अनुक्रमे ३१८३, ३२७४ मेगावॅट नोंदविण्यात आली होती, अशी माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.

मुंबईच्या किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही कमालीची घसरण नोंदविण्यात येत असून, गेल्या चार दिवसांत कमाल तापमान सहा अंशांनी खाली आले आहे. कमाल आणि किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरणात गारवा आला असून, सकाळसह दुपारी व रात्री सुटलेल्या गार वाऱ्यामुळे मुंबईकर थंडीचा आनंद घेत आहेत. तापमानातील घसरणीमुळे आणखी काही दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

मौसम झाला मस्ताना :

उत्तर पश्चिम दिशेला वाहत असलेल्या वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील हवामान आल्हाददायक झाले आहे. शिवाय हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला असून, पवई, विलेपार्ले, बोरीवली, वरळी, सायन आणि कुलाब्यातील हवेचा दर्जा चांगला नोंदविण्यात आला आहे - राजेश कपाडीया, वेगरिज ऑफ दी वेदर

२१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १२, तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक असेल. दुपारचे कमाल तापमान २८-३० म्हणजे सरासरीपेक्षा डिग्रीने अधिक असेल. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातील शहरांत पहाटेचे किमान तापमान एकांकी आहे. तापमानातील घसरणीमुळे आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम राहील - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ 

टॅग्स :मुंबई