मोकाट श्वानांमुळे मुंबईकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:43 AM2020-12-10T03:43:51+5:302020-12-10T03:44:30+5:30

Mumbai News : रस्त्यावरील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबईतील विविध परिसरांमध्ये मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत.

Mumbaikars suffer due to stray dogs | मोकाट श्वानांमुळे मुंबईकर त्रस्त

मोकाट श्वानांमुळे मुंबईकर त्रस्त

Next

मुंबई : रस्त्यावरील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबईतील विविध परिसरांमध्ये मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. हे मोकाट श्वान पादचारी तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग करत असल्याने शहरांमध्ये दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे. या दुर्घटना रोखण्यासाठी महानगरपालिकेकडे तक्रार करूनही महानगरपालिका यावर ठोस उपाययोजना करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेकडे कोणत्याच उपाययोजना नसल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे. 

२०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली होती त्यावेळेस मुंबईतील ९५ हजार १७४ मोकाट श्वानांपैकी २५ हजार ९३५ श्वानांचे लसीकरण करण्यात आले नव्हते. श्वानांपासून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी वर्षाला ३२ हजार श्वानांचे लसीकरण करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र शहरातील श्वानांसाठी पालिकेचे वॉर्डनिहाय केंद्र असले पाहिजे असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.

श्वान पकडण्यासाठी काय व्यवस्था आहे?
एखाद्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याची तक्रार मिळाल्यास पालिकेच्या वतीने त्या परिसरात श्वान पकडणारे कर्मचारी जाळे आणि वाहन घेऊन दाखल होतात. यानंतर त्यांना देवनार, परळ किंवा मालाड येथील उपचार केंद्रांवर नेऊन त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जातात.

या श्वानांना कोठे सोडले जाते?
श्वानांना त्यांच्या नेहमीच्या परिसरा व्यतिरिक्त दुसरीकडे सोडल्यास इतर श्वान त्याच्यावर हल्ला करतात. यामुळे उपचार केंद्रांवर श्वानांची नसबंदी व लसीकरण केल्यानंतर त्यांना जेथून पकडण्यात आले त्या परिसरात सोडले जाते.  

या प्रमुख भागांत त्रास : श्वानांची वेळोवेळी नसबंदी न केल्याने त्यांची संख्या वाढत आहे. शहरातील दाट लोकवस्तीचे परिसर, डम्पिंग ग्राउंड, हॉटेल, मासळी बाजार, कत्तलखाने, उकिरडे या ठिकाणी श्वानांची संख्या जास्त प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळेस या श्वानांची टोळी शहरातील रस्त्यांवर उभी असते. याचा त्रास पादचारी व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात होत होतो. 

मोकट श्वानांसाठी महानगरपालिकेचे प्रभागनिहाय उपचार केंद्र असायला हवे. शहरातील सर्व प्रकारच्या मोकाट प्राण्यांसाठी पालिकेने प्राणिमित्रांच्या मदतीने उपाययोजना करायला हव्यात.
- सुनिष सुब्रमण्यन कुंजु, मानद जिल्हा पशुकल्याण अधिकारी, मुंबई 

श्वानांचे नागरिकांवर होणारे हल्ले वाढत आहेत. यामुळे रस्त्यावरील मोकाट श्वानांवर पालिकेने लवकरात लवकर नियंत्रण आणायला हवे. अनेकदा नसबंदी करून देखील काही श्वानांना पिल्ले झाल्याची उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. यामुळे नसबंदी करतानाही योग्य ती काळजी घेण्यात यावी.                - सुयोग शिंदे, रहिवासी, कुर्ला
 

Web Title: Mumbaikars suffer due to stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.