मुंबई : कोविडकाळात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ताणतणाव अशा आजारांनी ग्रस्त व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या गटातील अशा नागरिकांचे सर्वेक्षण महापालिका करणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने महापालिका लवकरच हे सर्वेक्षण सुरू करणार आहे. यामध्ये केवळ उच्च रक्तदाब, मधुमेहाचेच रुग्ण नव्हे तर कर्करोग आणि हृदयविकार, पक्षघाताचा धोका असलेल्या लोकांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यानुसार १८ ते ६९ वर्षे वयोगटातील सहा हजार नागरिकांना या सर्वेक्षणात सामावून घेण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करताना विभाग स्तरावरील नागरिकांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. यामध्ये झोपडपट्टी व बिगरझोपडपट्टी विभागातही सर्वेक्षण केले जाणार आहे.
देशात मधुमेहाने ग्रस्त १० ते ११ टक्के नागरिक असण्याची शक्यता आहे. मात्र लोकसंख्येपैकी प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ताणतणावाचा त्रास असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र या वेळेस शहर पातळीवरील सर्वेक्षण करून अशा आजारांनी ग्रस्त अतिजोखमीच्या गटात किती नागरिक आहेत, याचा अंदाज घेण्यात येणार आहे.