जूनमध्येही मुंबईकर घामाघूम; सकाळी पाऊस, तर दुपारी उन्हाने होरपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:02 AM2024-06-06T10:02:56+5:302024-06-06T10:04:43+5:30
गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत येण्यास १० जून उजाडण्याची शक्यता असतानाच बुधवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला.
मुंबई : गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत येण्यास १० जून उजाडण्याची शक्यता असतानाच बुधवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटके बसले. उकाड्याचे प्रमाण अधिक असल्याने जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांची घामाच्या धारांनी अंघोळ होत होती.
गुरुवारी शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्य: आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे मान्सून वेळापत्रकानुसार दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचल आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
... येथे मान्सूनची कधीही हजेरी
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे दक्षिण, अहमदनगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून १० जूनपर्यंतच्या पाच दिवसांदरम्यान कधीही हजेरी लावण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.