मुंबई : काही दिवसांपूर्वी उकाड्यामुळे हैराण होणाऱ्या मुंबईकरांना अचानक वादळाला सामोरे जावे लागत आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे. या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला, दमा अशा आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्या मिश्र वातावरणाचा अनुभव घेतला जात आहे. हवामानातील हा बदल आरोग्यासाठी धोकादायक आहे. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळावण्याची शक्यता असते.
बदलत्या हवामानामुळे परागकण, बुरशीजन्य कण, धूळ अशा हवेतून पसरणाऱ्या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे श्वसनसंस्थेमध्ये ॲलर्जी निर्माण होऊन दमा, सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, न्यूमोनिया असे आजार वाढीस लागतात. फिजिशिअन डॉ. संतोष धुमाळे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट असताना आता वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढू शकते.