मुंबईकरांना श्रावणसरींनी झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 05:58 AM2017-08-15T05:58:57+5:302017-08-15T05:59:00+5:30
श्रावण महिना सुरू झाल्यापासून दीर्घकालीन विश्रांती घेतलेला पाऊस सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मनमुराद बरसला.
मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्यापासून दीर्घकालीन विश्रांती घेतलेला पाऊस सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मनमुराद बरसला. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत शहरात दुपारी बरसलेल्या जोरदार श्रावणसरींनी मुंबईकरांची तारांबळ उडाली. ऐन घरी जाण्याच्या चाकरमान्यांच्या वेळेला दाखल झालेल्या पावसामुळे कार्यालयीन कर्मचारी वर्गाची धावपळ उडाल्याचे चित्र होते.
जून महिन्याचा उत्तरार्ध आणि जुलै महिन्याच्या पूर्वार्धात बरसलेल्या मान्सूनने जुलैच्या उत्तरार्धासह आॅगस्टच्या पूर्वार्धात विश्रांती घेतली होती. कुठेतरी पडलेली तुरळक सर वगळता मुंबई कोरडीच होती. मात्र मागील २४ तासांत अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा परिणाम म्हणून रविवारपासूनच मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सोमवारी यात आणखी भर पडली आणि सकाळपासून पूर्व, पश्चिम उपनगरासह मुंबई शहरात दाखल झालेल्या सरींनी सायंकाळपर्यंत आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरात कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ, दादर, माहीम, भेंडीबाजार, भायखळा, लालबाग, परळ, माटुंगा येथे दुपारसह सायंकाळी पावसाचा जोर अधिक होता. पूर्व उपनगरातही सायन, कुर्ला, घाटकोपरसह पवई, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव आणि बोरीवली येथे तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
कुलाबा येथे १.८ मिलीमीटर, सांताक्रुझ येथे ५.८ तर शहरात २.१९, पूर्व उपनगरात ३.६८ आणि पश्चिम उपनगरात २.९३ मिमी पावसाची नोंद झाली. पडझडीच्या घटनाही घडल्या असून, पूर्व उपनगरात एका ठिकाणी घराचा भाग कोसळला. शहरात दोन ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. पश्चिम उपनगरात तीन ठिकाणे झाडे पडली. यात जीवितहानी झाली नाही. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात गडगडाटासह सरी पडतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
>रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत
मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत असतानाच मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरील गाड्या सकाळी १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, पावसामुळे तिन्ही मार्गांवर कुठेही पाणी साचले नव्हते. परिणामी, लोकलसह एक्स्प्रेस सेवा विलंबाने मात्र सुरळीत सुरू होत्या. रस्ते वाहतुकीवर पावसाचा किंचित परिणाम झाला होता. दिवसभर पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता.
>गेले काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस गोकुळाष्टमी दिवशी अचानक बरसला. सरींवर सरी बरसू लागल्याने मुंबईकर सुखावले. मात्र, या पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.