मुंबई : : भारतीय जनता पार्टीचा उद्या (दि.6) स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरानो उद्या बांद्रा कुर्ला परिसर आणि वेस्टर्न एक्स्प्रेसवरुन प्रवास करणे शक्यतो टाळा. भाजपाच्या या मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय मंत्री, कॅबिनेट व राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींची उपस्थिती राहणार आहे. तसेच, राज्यभरातून पाच लाख लोक या मेळाव्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी विशेष 34 रेल्वेंचे बुकिंग करण्यात आले. तसेच, रेल्वे स्थानकापासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये येण्यासाठी 500 बसेसच्या फे-या असणार आहेत. तर, 7000 बसेस वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन येणार असून 10,000 लहान वाहने सुद्धा या मेळाव्यासाठी येणार आहे. त्यामुळे बांद्रा कुर्ला परिसर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
शाही स्वागताचा विमान प्रवाशांना फटकादरम्यान, आज संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे आजही अनेकांना त्रास सहन करावा लागला. मुंबई विमानतळावर शहांचे आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्या गर्दीमुळे विमानतळाकडे निघालेल्या अनेक विमान प्रवाशांच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या.त्यापैकी एक प्रवाशी मुंबईतील एक राजकीय महिला नेत्याही होत्या. त्यांनी लोकमत ऑनलाइनला सांगितले की त्यांना मुंबईबाहेर जायचे होते मात्र गर्दीमुळे उशिरा पोहचल्याने विमान चुकले. तसेच बंगळुरुच्या जाणाऱ्या एका तरुणीलाही गर्दीचा फटका बसला. परदेशातून आलेल्या चौघांनाही गर्दीमुळे चार तिकिटे बाद झाल्याचा तोटा सहन करावा लागला. मात्र काही विमानकंपन्यांनी संमजस भूमिका घेत प्रवाशांची पुढच्या विमानात सोय केल्याने प्रवाशांचा राग निवळला.