मुंबई - लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहेत. सरकारच्या आदेशानुसार लोकल सर्वसामान्यांसाठी विशिष्ट कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहेत. हा प्रवास करताना आपणाला काळजी घ्यायची आहे. कारण कोरोनाचे अद्याप समूळ उच्चाटन झालेले नाही. परिणामी सूचनांचे पालन करत प्रवास करा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासी पुन्हा रेल्वेने प्रवास करण्यास जितके उत्सुक आहेत, तितकेच त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि योग्य खबरदारी उपायांचे पालन करण्याची गरज आहे, असे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले. प्रवास सुरू करण्यापूर्वी तिकिटे बुक करण्यासाठी कॉन्टॅक्टलेस मार्गांचा वापर करा. ई-पास / ई-तिकिट काढा. तुमच्यासोबत ३-प्लाय फेस मास्क, हँड सॅनिटायझर आणि काही निर्जंतुक वाइप्स ठेवा. मास्क बदलण्याची गरज असेल तर बंदिस्त बॅगेमध्ये आणखी काही मास्क सोबत ठेवा. घराबाहेर पडण्यापूर्वी ग्लोव्ह्ज घाला. प्रवास सुरू करण्यापूर्वी साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवा आणि त्यानंतर मास्क घाला. मास्क घातल्यानंतर तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी मास्कला स्पर्श करू नका किंवा काढू नका. सरकारने जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. इतर प्रवाशांपासून किमान ६ फूट अंतरावर उभे राहा. समूहांमध्ये गर्दी करणे टाळा. रेल्वेने कुठे उभे राहावे किंवा बसावे. कुठे रांगेत उभे राहावे आणि बाहेर पडण्याचा मार्ग यासंदर्भात चिन्हे तयार केली आहेत. त्या चिन्हांचे पालन करा. तिकिट मशिन्स, हँडरेल्स, एलिव्हेटर बटन्स अशा पृष्ठभागांना स्पर्श करणे शक्यतो टाळा. तुम्ही या पृष्ठभागांना स्पर्श केला तर त्वरित साबण किंवा पाण्याने हात स्वच्छ धुवा किंवा ६० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करा. सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर किमान २० सेकंद साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवा, असे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर किमान २० सेकंद साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवा. घातलेला मास्क काढून टाका आणि त्याऐवजी नवीन मास्कचा वापर करा. अगोदर वापरलेला मास्क धुण्यासाठी बंदिस्त बॅगेमध्ये ठेवता येऊ शकतो किंवा त्याची विल्हेवाट लावता येऊ शकते. कॅफेटेरियाजमध्ये गर्दी करणे टाळा आणि सुरक्षित अंतर ठेवा. शक्यतो, ब्रेकदरम्यान एकत्र खाणे टाळा.
मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 3:05 AM