मुंबई : जीवघेण्या कोविडविरोधात पालिकेने मोहीम हाती घेतली असून, कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून काही व्हॅक्सिन सेंटर बंद करण्याबाबत पालिका त्याबाबत लवकरच आढावा घेण्यात येणार आहे.
आटोक्यात असला, तरी कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट सापडत आहेत. त्यामुळे धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसल्याने खबरदारी म्हणून बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक लस घेताना मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईत विविध भागात व्हॅक्सिन सेंटर सुरू केले आहेत. मात्र या बहुतांशी सेंटर्सकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याने व्हॅक्सिन सेंटर ओस पडले आहेत. त्यामुळे काही व्हॅक्सिन सेंटर बंद करण्याचा अथवा सेंटर सुरू ठेवण्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा लवकरच घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
५२ ठिकाणी घेता येईल व्हॅक्सिन
पालिकेने ५२ ठिकाणी व्हॅक्सिन सेंटर उभारली आहेत. तिथे कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन सकाळी ९ ते ३ या वेळेत घेता येते. मुंबईतील पालिका रुग्णालये, प्रसूतिगृह, शाळा, सभागृह येथे आगाऊ बुकिंग अथवा ऑन द स्पॉट व्हॅक्सिन घेता येते.