Join us

सायकल ट्रॅकची मुंबईकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:10 AM

मुंबई - वाढत्या वाहनांबरोबरच शहरात प्रदूषणही वाढत असल्याने पर्यावरणस्नेही सायकलवारीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार मुंबईत सायकल ...

मुंबई - वाढत्या वाहनांबरोबरच शहरात प्रदूषणही वाढत असल्याने पर्यावरणस्नेही सायकलवारीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार मुंबईत सायकल ट्रॅक तयार करण्याचा प्रकल्प अनेकवेळा कागदावर साकारण्यात आला. प्रत्यक्षात मुंबईकर आजही सायकल ट्रॅकच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आता कोविडचा खर्च आणि उत्पन्नात घट झाल्याने वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या प्रकल्पाला नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला आहे.

कोविड काळात मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी झाली होती. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषण वाढले आहे. यावर सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकलवारीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे. मात्र सायकल ट्रॅक टाकण्याचे महापालिकेचे प्रयत्न तोकडे पडले आहेत. त्यामुळे सायकल ट्रॅकचे प्रस्ताव केवळ कागदावरच धावत असल्याचे दिसून आले आहे.

असे झाले होते प्रयत्न...

* वांद्रा-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने आठ कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक’ तयार केला. मात्र प्रत्यक्षात आता ट्रॅक असला तरी त्याचा वापर अपवादानेच होत आहे.

* २०१७ मध्ये मरिन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंत पाच कि.मी.चा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. रविवारी प्रतितास शंभर रुपये या दराने तेथे सायकल उपलब्ध केली जात होती. तर नरिमन पॉईंट ते वरळी सी-लिंक या १० कि.मी. पट्ट्यात दर रविवारी सकाळी एक मार्गिका सायकलकरिता राखून ठेवण्यात येत होती. मात्र याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

* तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा असलेल्या झोपड्या हटवून या जागेवर ३९ कि.मी. लांबीचा ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पालिका ३५० कोटी रुपये खर्च करणार होती. सन २०१८ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. २०२० पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या प्रकल्पाचे ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्यात आली आहे.

* वांद्रे किल्ला ते माहील किल्ल्यापर्यंत सायकल ट्रॅकसाठी १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. मात्र कोविड प्रादुर्भावामुळे महापालिकेवरील आर्थिक भार वाढला आहे. अशावेळी सायकल ट्रॅकसारखा प्रकल्प आवश्यक नसल्याचे मत नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.

रस्ते दुरुस्ती, उद्यानांची कामे, रस्त्यांची दुरुस्ती अशा आवश्यक कामांसाठी महापालिकेकडे निधी नाही. करदात्यांच्या पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा सायकल ट्रॅकचा प्रकल्प रद्द करून तो निधी नागरी सुविधांसाठी देण्यात यावा.

- विनोद मिश्रा (नगरसेवक, भाजप)

सायकल ट्रॅकची संकल्पनाच मुंबईत फेल गेली आहे. कोविड काळात आरोग्य यंत्रणासाठी निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी निधीची आवश्यकता असताना सायकल ट्रॅकसारखा प्रकल्प हाती कसा घेतला जातो?

- रवी राजा (विरोधी पक्षनेते)