Join us

मुंबईकर मास्क नाका-ताेंडाऐवजी लावतात हनुवटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:06 AM

नियमांचे उल्लंघन : क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये तू तू मैं मैंलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी मास्क लावून ...

नियमांचे उल्लंघन : क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये तू तू मैं मैं

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी मास्क लावून घराबाहेर पडणे मुंबई महापालिकेने बंधनकारक केले असून, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठाविण्यासाठी क्लीनअप मार्शल तैनात केले आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना क्लीनअप मार्शलकडून दंड ठोठाविला जात असला तरी अनेक घटनांत नागरिक आणि क्लीनअप मार्शलमध्ये शाब्दिक संघर्ष घडत आहेत. काही प्रकरणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली असून, क्लीनअप मार्शल अरेरावी करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दुसरीकडे नागरिकच ऐकत नसल्याचे म्हणणे क्लीनअप मार्शलने मांडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेने सातत्याने आवाहन करूनही अनेक नागरिकांचा मास्क नाका-तोंडाऐवजी हनुवटीवर ठेवत असल्याचे चित्र आहे.

नाताळ आणि मार्गशीष महिन्याच्या निमित्ताने बुधवारसह गुरुवारी मुंबईच्या बाजारपेठांत किंचित गर्दी हाेती. दादर, प्रभादेवी, कुर्ल्यासारख्या मोठ्या बाजारपेठा माणसांनी फुलून गेल्या हाेत्या. दरम्यान, झवेरी बाजार, भायखळा मार्केट, कुर्ला येथील मार्केटसह उर्वरित सार्वजनिक ठिकाणी क्लीनअप मार्शलकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. विनामास्क फिरणाऱ्या तसेच थुंकणाऱ्या नागरिकांकडूनही दंड आकारला जात आहे. मात्र अशा अनेक प्रकरणांत नागरिक आणि मार्शल यांच्यात वाद होत आहेत.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, क्लीनअप मार्शल बहुतांश ठिकाणी गणवेशावर नसतात. शिवाय त्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसते. काही ठिकाणी मार्शल लपून कारवाई करतात. तर झवेरी बाजार येथील मार्शलच्या म्हणण्यानुसार, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आम्ही कारवाई करतो. पण बाजारात अनेकदा अडचणी येतात. भायखळा येथील मार्शलच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना कितीही सांगा मात्र ते ऐकत नाहीत. लोकांना पकडले तर ते पळ काढतात. अनेकदा वादाचे प्रसंग घडतात.

दरम्यान, बुधवारी कुर्ला येथे कारवाई करणारे मार्शल साध्या वेशात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘लोकमत’कडे केल्या. दुसरीकडे बहुतांश सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी नाका-तोंडावर मास्क लावण्याऐवजी हनुवटीवर लावल्याचे चित्र हाेते.

* ...तर २०० रुपये दंडाची आकारणी

- महापालिकेने संस्थांच्या माध्यमातून २४ प्रभागात मार्शल नेमले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले. दंड आकारणाऱ्या मार्शला टार्गेट देण्यात आले आहे. करारानुसार दंडाद्वारे प्राप्त झालेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम पालिकेला मार्शलची नेमणूक करणाऱ्या संस्थांना द्यावी लागते. पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक यांच्यासाेबतच विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांबाहेर, बसथांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी मार्शलचा खडा पहारा आहे.

......................................