Join us

मुंबईकरांनो, स्वच्छ मुंबईसाठी आता व्हाॅट्सॲप करा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:31 PM

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या हेल्पलाइनचा प्रारंभ, तातडीने कारवाईच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने तशा सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत मांडत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छ मुंबईसाठी पालिकेच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकाचा प्रारंभ झाला. नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारींसाठी ८१६९६८१६९७ या विशेष क्रमांकाची सुविधा दिली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे आणि त्यासाठी मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सतर्क ठेवावी. मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आठ तासांत कार्यवाही अपेक्षित :  मुंबईत कचऱ्याचा प्रश्न भयंकर स्वरूप घेत असून रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या नालेसफाई दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार हा क्रमांक दिला आला असून, नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रणालीसाठी पालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओरशिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न  प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशी असेल सुविधा 

कचऱ्याच्या तक्रारी व संबंधित छायाचित्र व ठिकाण / जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदविता येणार नाहीत, तसेच हेल्पलाइन व्हॉटस्ॲप स्वरूपातील असल्याने त्यावर बोलण्याची, संभाषणाची सुविधा नसेल असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वॉर्ड अधिकारी तक्रारींचे संनियंत्रण करतील.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई