मुंबई : राज्यासह मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढत असतानाच, आता सुरू झालेल्या वैशाख महिन्यामुळे तापमानात आणखी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, दमट हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराचे कमाल तापमान वैशाख महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे, मंगळवारी, बुधवारी अनुक्रमे ३४, ३८ अंशावर जाण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १७ एप्रिल रोजी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. १८ एप्रिल रोजी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. परिणामी, मुंबईकरांना बसत असलेल्या उन्हाच्या तडाख्यात आणखी वाढ होणार आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे, शिवाय वाहते गरम वारे आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. दिवसा तापदायक ऊन आणि रात्री उकाडा, अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त झाले असून, यात उत्तरोत्तर आणखी भर पडणार आहे.राज्याचा विचार करता, गेल्या २४ तासांत मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १८ एप्रिल रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. १९ ते २० एप्रिलदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.आनंद पोहण्याचा... उन कमालीचेवाढले आहे. त्यामुळे वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात पोहून उन्हाला चले जाव म्हणत शाळेला पडलेल्या उन्हाळी सुट्टीचाही मुलांनी आनंद लुटला.१६ एप्रिल : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडेल.१७ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
मुंबईकरांना वैशाख वणव्याचे चटके, कमाल तापमान जाणार ३८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:09 AM