आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबईकर होणार सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 02:03 AM2021-01-03T02:03:23+5:302021-01-03T02:03:35+5:30
पालिका प्रशासन : उद्यापासून परळ येथे प्रशिक्षण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घराचा भाग पडणे, शॉर्टसर्किट, आगी लागणे अशा छोट्यामोठ्या घटना मुंबईत घडत असतात. अशा घटनांची माहिती मिळताच मदत यंत्रणा तत्काळ पाठवली जाते. परंतु, ती घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी अनेक वेळा जीवितहानीचा धोका वाढतो. त्यामुळे अशा संकटाच्या काळात काय करावे? याबाबतची प्राथमिक माहिती व प्रशिक्षण प्रत्येक मुंबईकरांना देण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार परळ येथून प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात येत्या सोमवारपासून होईल.
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुसार सन २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईत ३९४५ इमारत दुर्घटनेत ३०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २०१३ ते २०१८ या सहा वर्षांत विविध ४९ हजार १७९ दुर्घटना घडल्या. त्यामध्ये ९८७ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणेे अशा प्रकारच्या ९,९४३ दुर्घटनांमध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला.
आपत्ती काळात प्रसंगावधान राखून आपले व आपल्या कुटुंबाचे प्राण कसे वाचवावे? याबाबत फार कमी लोकांना माहिती असते. दुर्घटना काळातील सुरुवातीचा एक तास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र वाहतुकीची कोंडी, अरुंद रस्ते व चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अनेक वेळा मदत घटनास्थळी वेळेवर पोहोचण्यास विलंब होतो. अशा वेळी मदतकार्य पोहोचेपर्यंत प्रशिक्षित मुंबईकर खबरदारी घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवू शकेल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.
प्रभागातील ५० नागरिकांना करणार सहभागी
nपरळ येथील प्रभाग क्रमांक २०४ मधील नागरिकांसाठी प्रथम प्रतिसाद प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी पार पडणार आहे.
nआपत्कालीन काळात काय काळजी घ्यावी? याबाबतचे प्रशिक्षण महापालिकेतर्फे देण्यात येईल. हे प्रशिक्षण नागरिकांना विभागनिहाय पद्धतीने व टप्प्याटप्प्याने दिले जाईल.
nकोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रभागातील ५० नागरिकांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येईल.