नव्या केंद्रातून २००० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:19 PM2023-10-12T13:19:01+5:302023-10-12T13:19:54+5:30
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा पालिका जल विभागाकडून करण्यात येतो.
मुंबई : भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आयुर्मान संपले आहे. दरम्यान, हा जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता (प्रकल्प) विभागाने दिली आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा पालिका जल विभागाकडून करण्यात येतो.
पाणीचोरी आणि गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच सुमारे साडेआठशे ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत असतो. यातील भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पात १९१० दशलक्ष लिटर इतक्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.
दोन हजार दशलक्ष क्षमतेचा नवा प्रकल्प
भांडुपमधील या जलशुद्धीकरण प्रकल्पाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची संरचना कुमकुवत झाली असून त्याचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय जल अभियंता अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. नव्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या विभागाने दिली.
४ वर्षांचा कालावधी लागणार
नव्याने बांधण्यात येणाऱ्या या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी १४६० दिवस म्हणजेच ४ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलशुद्धीकरण (प्रकल्प) विभागाने दिली आहे.
पालिका पाणी शुद्धीकरण प्रकल्प
- पालिकेतर्फे दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याच्या पुरवठा नागरिकांना केला जातो.
- जल विभागाने सेवा जलाशय व जलवितरण व्यवस्थेत निवडक ३५८ ठिकाणे पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केली आहेत.
- आरोग्य व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून रोज ११० ते १३० ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत ‘मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक’ (एमएफटी) या अद्ययावत व अचूक तंत्रज्ञानाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार तपासले जातात.
२५% पाणी जाते गळतीमुळे आणि पाणीचोरी दिवसाला वाया
भांडुप संकुल जल शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प
२००० एमएलडीप्रस्तावित प्लँटची क्षमता
१,९१० एमएलडी जुन्या प्लँटची क्षमता
९०० एमएलडी २०१८ मध्ये कार्यान्वित प्लँटची क्षमता