मुंबईकरांना मिळणार एअर क्वालिटी वॉर्निंग, प्रदूषणाचा होणारा परिणाम टाळता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 07:27 AM2023-08-28T07:27:43+5:302023-08-28T07:27:53+5:30
सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी संस्थेतर्फे आयोजित इंडिया क्लीन एअर समिट २०२३ मध्ये यासंदर्भात आयआयटीएमतर्फे सादरीकरण करण्यात आले.
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिअरॉलॉजीच्या पोर्टलवर एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या माध्यमातून हवा प्रदूषणाच्या पातळीबाबत रिअल टाइम माहिती आणि प्रदूषणाच्या पातळीचा संभाव्य अंदाज जाणून घेता येणार असल्याने आता हवा प्रदूषणामुळे त्रास सहन करावा लागलेल्या मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांना सज्ज राहता येणार आहे.
सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी संस्थेतर्फे आयोजित इंडिया क्लीन एअर समिट २०२३ मध्ये यासंदर्भात आयआयटीएमतर्फे सादरीकरण करण्यात आले. या वेबसाइटवर मुंबई महानगर प्रदेशातील २४ ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाबाबत माहिती, रिअल टाइम डेटा तसेच भविष्यातील अंदाज उपलब्ध आहेत.
कुठे आहेत स्थानके?
आयआयटीएमने हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या भारतभरातील ४२० स्थानकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती एकत्र केली आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईत ही स्थानके आहेत.
२४ मॉनिटरिंग स्टेशन्स
मुंबई महानगर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण २४ मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. मुंबईत हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी २० स्थानके आहेत. त्यापैकी काही स्थानके नेव्ही नगर, मालाड (पू), बोरिवली (पू), देवनार, पवई, मुलुंड (पश्चिम), वांद्रे कुर्ला संकुल आणि चकाला येथे आहेत. इतर चार स्थानके महापे, वसई, नेरूळ आणि कल्याणमध्ये आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची माहिती गोळा करणे ही जगभरात एक दुर्मीळ बाब आहे. मुंबईतून ही माहीती गोळा करताना आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. आमची यंत्रणा अचूकतेवर आधारित आहे. वेबसाइटवरील माहितीमुळे नागरिक सतर्क राहतील. प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम वेबसाइटचा वापर करून टाळता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी वेबसाइट उपयुक्त असेल. कारण त्यांना श्वासाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
- डॉ. सचिन घुडे, शास्त्रज्ञ आयआयटीएम
गृहनिर्माण संस्थांनी लो कॉस्ट सेन्सर्स उभारण्यासाठी पुढाकार घेतला तर नागरिकांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या माहितीची अत्यंत महत्त्वाची भूमिका असू शकते. प्रदूषणाची पातळी कमी करण्याबाबत मदत होईल. प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनालाही मदत होईल.
- डॉ. प्रतिमा सिंग, शास्त्रज्ञ, एअर क्वालिटी, सीस्टेप