नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार दोन मेट्रोंचे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:03 IST2024-12-30T11:02:33+5:302024-12-30T11:03:26+5:30

नव्या वर्षात मेट्रो ९ आणि मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यांसह मेट्रो ३ मार्गिकेचा उर्वरित संपूर्ण मार्गही प्रवाशांच्या सेवेत येईल...

Mumbaikars will get two metro trains as a gift in the new year | नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार दोन मेट्रोंचे गिफ्ट

नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार दोन मेट्रोंचे गिफ्ट

अमर शैला, प्रतिनिधी

नव्या वर्षात पाऊल ठेवायला आता अवघा एकच दिवस उरला आहे. या नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी दोन मेट्रोंचे गिफ्ट मिळणार आहे. दोन नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे या वर्षात सुरू होतील. त्यामध्ये दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल तर मंडाले ते डी. एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेचा मंडाले ते डायमंड गार्डन (चेंबूर) हा मार्ग वर्षअखेरीस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्यातून २०२५ मध्ये मुंबईकरांचा प्रवास आणखी काहीसा सुसह्य होऊ शकेल.

नव्या वर्षात मेट्रो ९ आणि मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यांसह मेट्रो ३ मार्गिकेचा उर्वरित संपूर्ण मार्गही प्रवाशांच्या सेवेत येईल. त्यातून मुंबईतील पश्चिम उपनगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे. कुलाबा येथून निघालेल्या प्रवाशांना मेट्रोने थेट मीरा-भाईंदर येथील काशीगावपर्यंत पोहोचणे शक्य होईल. मात्र, सध्या गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेचे काम सुरू असल्याने प्रवाशांना थेट प्रवास करता येणार नाही. त्याऐवजी प्रवाशांना मेट्रो ३ मधून मरोळ स्थानकात उतरून पुढे मेट्रो १ मार्गिकेवरून पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकापर्यंत प्रवास करावा लागेल. तिथून पुढे मेट्रो ७ मार्गिकेवरून प्रवास करून काशीगावपर्यंत जाता येईल. मेट्रो ७ अ मार्गिका सुरू होईपर्यंत प्रवाशांना दोन गाड्या बदलाव्या लागतील. मात्र, मेट्रो ७ अ मार्गिका सुरू झाल्यावर हा प्रवासही आणखी सुखकर होऊ शकेल. दरम्यान, पूर्व उपनगरातील प्रवाशांना मेट्रोच्या प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

मुंबई महानगरात ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे तयार केले जाणार आहे तसेच भविष्यात या मेट्रोच्या जाळ्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएने २०४२ मधील वाहतुकीच्या अनुषंगाने मुंबई महानगरांचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. सध्या त्यातील मुंबईत ५९ किमी लांबीचे मेट्रो जाळे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे तर जवळपास १५३ कि.मी. लांबीच्या मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यात एमएमआरडीएकडून जवळपास १३२ कि.मी. लांबीच्या मार्गाचे काम केले जात आहेत. तर कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या बीकेसी ते कुलाबा या २०.८ कि.मी. लांबीच्या उर्वरित मार्गाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून केले जात आहे. त्यातून येणाऱ्या पाच वर्षांत मुंबई महानगरातील मेट्रोच्या जाळ्यात आणखी १५३ कि.मी.च्या जाळ्याची भर पडणार आहे. 

दरम्यान, मेट्रो मार्गिकेच्या कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. कांजूरमार्ग ते स्वामी समर्थ नगर मेट्रो ६ मार्गिकेची कामे पूर्णत्वाच्या दिशेने निघाली आहेत. मात्र, या मेट्रोसाठी अद्याप कारशेडची जागा मिळालेली नाही. हीच स्थिती वडाळा कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कारशेडच्या जागेबाबत आहे. त्यातून या दोन्ही महत्त्वाच्या मेट्रोंच्या कारशेडचे काम सुरु होऊ शकले नाही. त्यातच कापुरबावडी ते कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या कारशेडचीही पूर्ण जागा अद्याप एमएमआरडीएला मिळाली नाही. राज्य सरकारने लक्ष घालून कारशेडच्या जागांचे प्रश्न न सोडविल्यास या मेट्रो मार्गिका सुरू होण्यास विलंब होणार आहे. पर्यायाने मुंबईकरांना सुसह्य प्रवासासाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नसेल तसेच विलंबामुळे या प्रकल्पांच्या खर्चातही वाढ होऊन त्याचाही बोजा सर्वसामान्यांवरच 
पडणार आहे.
 

Web Title: Mumbaikars will get two metro trains as a gift in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.