सोन्या-चांदीचा धूर मुंबईकरांना सहन होईना; पालिकेचा हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:03 AM2023-11-08T11:03:58+5:302023-11-08T11:04:10+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि मुंबईचे हृदय असलेल्या झवेरी बाजार, भुलेश्वर आणि काळबादेवी परिसर विषारी धुराने भरलेला असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक सातत्याने करीत आहेत.
मुंबई : शहरातील सी वॉर्डातील नागरीवस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराड्यांवर मुंबई महापालिकेच्यावतीने कारवाई झाली आहे. वायुप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सातत्याने या वॉर्डातील स्थानिक रहिवाशांकडून या व्यावसायिकांच्या विरोधात वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान याची दखल घेत व्यावसायिकांचे एकूण ४ धुरांडे (चिमणी) जमीनदोस्त करण्यात आली. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि मुंबईचे हृदय असलेल्या झवेरी बाजार, भुलेश्वर आणि काळबादेवी परिसर विषारी धुराने भरलेला असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक सातत्याने करीत आहेत. भुलेश्वरमध्ये दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांचे हजारो बेकायदा युनिट्स चालतात, शेकडो वेळा तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या युनिट्सचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सोने-चांदी वितळवण्यासाठी होत आहे भट्टीचा वापर
महापालिकेने ६ नोव्हेंबर रोजी येथील परिसराची पाहणी केली. सोने-चांदी वितळवण्यासाठी छोटा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारा वायू चिमणी तसेच धुरांडे याद्वारे हवेत सोडला जातो.
शास्त्रीय प्रक्रिया न करता हा धूर सोडण्यात आल्याने मानवी आरोग्याला धोका पोहोचत आहे. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने पालिकेने वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे.
कारवाई न करता एकमेकांकडे बोट
मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस हे सगळे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने त्यांना अभय मिळाले. दरम्यान, वायुप्रदूषणावर पालिकेने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली असून सी वॉर्डांतर्गत इमारत कारखाने विभागाने धानजी मार्ग आणि मिर्झा मार्ग येथील कारवाई त्याचाच एक भाग आहे.