मुंबई : सुखकर प्रवासासाठी एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीए अंधेरी पश्चिम ते मानखुर्द दरम्यान ‘मेट्रो २ ब’ ही मार्गिका उभारत आहे. या मेट्रोचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर हा पहिला टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत आणण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.
पूर्व उपनगराला पश्चिम उपनगरशी जोडण्यासाठी मेट्रो २ ब ची उभारणी केली जात आहे. अंधेरी डी एन नगर ते मानखुर्द मंडाळे दरम्यान मेट्रो २ ब धावणार आहे.
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’अंतर्गत अंधेरी पश्चिम ते मंडाळे असा करण्यात येणार आहे २३.६४ किमी लांबीचा हा मार्ग असून या मार्गिकेसाठी मंडाळे मानखुर्द येथे ३१ हेक्टर जागेत कारशेड उभारण्यात येत आहे.
या कारशेडचे काम ८०.७२ टक्के पूर्ण झाले असून या कारशेडमध्ये एका वेळेला ७२ गाड्या उभ्या करता येणार आहेत. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या बंगळुरू येथून आणण्यात आल्या असून तेथील भारत अर्थ मूवर्स लिमिटेड कंपनीने या गाड्यांची बांधणी केली आहे.
मार्गिकेवर २० स्थानके :
‘मेट्रो २ ब’च्या मार्गिकेवर २० स्थानके असणार आहेत. या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या गाड्या मंडाळे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आणखी काही गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. मेट्रो गाड्या दाखल झाल्याने या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर असा टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
चाचणी होणार:
या कारशेडमध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या मेट्रो गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची लवकरच जोडणी करून चाचणी घेण्यात येणार आहे.
अंधेरी पश्चिम ते मानखुर्द दरम्यान मेट्रो २ ब ही मार्गिका बांधून झाल्यानंतर या १०.५ लाख प्रवासी प्रवास करतील. एलिव्हेटेड बांधण्यात येणार असून १०,९८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.