लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर आणि वेगवान होण्यासाठी पालिका वर्सोवा ते दहिसर असा कोस्टल रोड बांधत आहे. पालिका या प्रकल्पासाठी १६ हजार ६२१ कोटी इतका खर्च करणार असून पालिकेने या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. सहा टप्प्यांत हा प्रकल्प बांधण्यात येणार असून २२ किमी लांबीच्या मार्गामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. तर, वरळी ते वांद्रे दरम्यान पालिकेने या पूर्वीच सी लिंक बांधला आहे. पालिकेने दहिसर ते भाईंदर दरम्यान कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय घेतला असून त्याचे कामही कंत्राटदाराला सोपविण्यात आले आहे. मुंबईकरांना अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून अंधेरीतील वर्सोवा ते दहिसर दरम्यान कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सीलिंक प्रमाणे या प्रकल्पाची मार्गिका केबल स्टेड पूल तसेच खाडी पट्ट्यातून जाणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ११ सप्टेंबर ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, हा रस्ता झाल्यानंतर प्रवाशांना अधिक वेगवान जाता येईल असा आशावाद संबंधित यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सहा टप्प्प्यांत होणार कामवर्सोवा ते बांगूरनगर, बांगूरनगर ते मालाड माइंड स्पेस आणि गोरेगाव-मुलुंड लिंक जोडणी, माइंड स्पेस ते चारकोप उत्तरेकडील बोगदा, माइंड स्पेस ते चारकोप दक्षिणेकडील बोगदा, चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर असा बांधण्यात येणार आहे.
जीएमएलआरला जोडणारगोरेगाव-मुलुंड लिंक रोड तयार झाल्यानंतर या मार्गावरून थेट नवीन कोस्टल रोडला जाता येणार असल्याने जीएमएलआरवरून थेट कोस्टल रोड गाठता येणार असल्याने पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.