पावसाने उडाली मुंबईकरांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:26 AM2018-06-26T06:26:32+5:302018-06-26T06:26:51+5:30

शनिवारसह रविवारी लागून राहिलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चांगलाच जोर कायम ठेवला. सकाळपासून शहरासह उपनगरात दिवसभर दमदार बरसलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला.

Mumbaikars woke up with rain | पावसाने उडाली मुंबईकरांची तारांबळ

पावसाने उडाली मुंबईकरांची तारांबळ

googlenewsNext

मुंबई : शनिवारसह रविवारी लागून राहिलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चांगलाच जोर कायम ठेवला. सकाळपासून शहरासह उपनगरात दिवसभर दमदार बरसलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सर्वच लोकलला पावसाचा फटका बसल्याने गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी चाकरमान्यांची तारांबळ उडाली. रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला. रस्त्यांवर ठिकठिकाणी सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेग
मंदावल्याने वाहतूककोंडी झाली. एकंदर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बरसलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.
सोमवारची पहाटच उजाडली ती मुसळधार पावसाने. सूर्योदय होण्याआधीच पावसाने सर्वत्र आपला मारा सुरू केला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी सुरू झालेल्या
पावसाने रात्री उशिरापर्यंत आपला मारा कायम ठेवला.
मुंबईत शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावर ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. याचा विपरीत परिणाम म्हणून वाहतूककोंडीसह ठिकठिकाणची वाहतूक धिम्या मार्गाने धावत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भायखळा, हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमा, कमानी जंक्शन आणि घाटकोपर येथील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. परिणामी येथील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याने वाहतूक धिम्या गतीने होत होती.
मुंबईत मुसळधार पावसाचा रेल्वे विशेषत: रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

पावसाचा मारा सुरू असतानाच ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. आझाद मैदान येथे झाड पडून झालेल्या दुर्घटनेत परशुराम बस्तीन (७४) आणि राजेंद्र सिंग (६०) या दोघांचा मृत्यू झाला. मालाड पश्चिमेकडील एव्हरशाइन नगर येथील नाल्यात पडून नागेंद्र नागार्जुन (१८) या तरुणाचा मृत्यू झाला.
अंधेरी पूर्व येथे जाधव चाळीची बाल्कनी कोसळून झालेल्या दुर्घटनेत राजकुमारी गौड ही महिला जखमी झाली. जखमी महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

सायन किंग सर्कल, वांद्रे नॅशनल कॉलेज, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय, चेंबूर फाटक, सायन प्रतीक्षानगर, सांताक्रूझ मिलन सबवे, पवई मोरारजी नगर, पवई फिल्टरपाडा येथे वाहतूककोंडी झाली. परिणामी येथील वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले होते.


कोकण, प. महाराष्ट्रात जोर
कोकणात धुवाधार पाऊस सुरूच आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच
जोर होता. दिवसभरात अनुक्रमे ७४.२२ आणि ६३.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लांजा, गुहागर, राजापूर, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, खेड आदी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत दिवसभर पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळावा जिल्ह्यात पावसाचा जोर होता. सातारा शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. कोयनानगर धरण परिसरातही पाऊस सुरूच आहे. मराठवाडा, विदर्भात मात्र पावसाने सुट्टी घेतली.

महामार्ग पाण्याखाली
पालघर : जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू
झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत
झाली. पावसामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या किनारा हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम दृतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला.

नाशिकमध्ये संततधार
नाशिक शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत पडत होता. निफाड, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. खान्देशातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडला.

ठाणे जिल्ह्याला झोडपले
रविवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्याला सोमवारीही झोडपून काढले. मुरबाडसह सर्वच तालुक्यांत गेल्या २४ तासांत १०० मिमीच्यावर पाऊस झाला. यात जिल्ह्यातील उल्हासनगर येथे पावसामुळे कम्पाउंडची भिंत कोसळून १५ वर्षीय किरण घायवट या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले. ठाण्याच्या कळवा येथील सम्राट अशोकनगर शौचास गेलेल्या विजय पवार या आठ वर्षांचा मुलाचा नाल्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.
 

Web Title: Mumbaikars woke up with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.