कोरोना रोखण्यासाठी मुंबईचा ॲक्शन प्लॅन, चाचण्यांचे प्रमाण ५० हजारांवर नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:27 AM2021-03-20T03:27:06+5:302021-03-20T06:53:57+5:30
लसीकरणाला वेग आणण्यासाठी खासगी व पालिका रुग्णालयांसोबत आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली.
मुंबई: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार, दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्यात येणार आहे. दररोज एक लाख, याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी लस देणाऱ्या खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरून ८० पर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लसीकरणाला वेग आणण्यासाठी खासगी व पालिका रुग्णालयांसोबत आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांतील खाटांचे व्यवस्थापन, तसेच लसीकरण यावर आयुक्तांनी सूचना केल्या. लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरून ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.मंजुरी मिळताच, सर्व सरकारी वखासगी रुग्णालये मिळून रोज किमान एक लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे.
‘लसीकरण वाढवा’
- सद्यस्थितीत ५९ खासगी रुग्णालयांमध्ये दररोज केवळ चार हजार लोकांचे लसीकरण होते. प्रत्येक रुग्णालयाने दररोज किमान एक हजार नागरिकांचे लसीकरण करावे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी.
- लसीकरणाचे जास्तीतजास्त बुथ करावेत. पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्यवस्था असावी, पुरेसा कर्मचारी वर्ग असावा. पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष करावेत, जेणेकरून लवकर लस देता येईल. गर्दी होणार नाही.
- लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ असावी. शक्य असल्यास २४ तास लसीकरणाची सोय करावी.