विदेशी लुटारूंच्या जाळ्यात मुंबईची अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:35 AM2018-09-12T05:35:54+5:302018-09-12T05:36:07+5:30
फेसबुकवरून मैत्री करायची. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच विदेशातून गिफ्ट पाठवायचे.
मुंबई : फेसबुकवरून मैत्री करायची. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच विदेशातून गिफ्ट पाठवायचे. गिफ्टच्या बहाण्याने कस्टम अधिकारी, पोलीस, गुन्हे शाखा यांच्या नावे विविध शुल्क उकळायचे, असे विदेशी लुटारूंचे रॅकेट आहे. त्यांच्या जाळ्यात मुंबईची अभिनेत्री अडकली. विदेशातून आलेल्या गिफ्टसाठी तिने सुरुवातीला लाखभर रुपये भरले. मात्र, त्यानंतर वेळीच सावध होत थेट पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी इंग्लंडचा केलवीन लुकासविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मूळची गोव्याची असलेली ३४ वर्षीय अभिनेत्री अंधेरी परिसरात राहते. ७ एप्रिलपासून फेसबुक मेसेंजरवर तिला केलवीन लुकास याने संदेश पाठविणे सुरू केले. त्याने तो इंग्लंडचा रहिवासी असून इंजिनीअर असल्याचे सांगितले. तीदेखील त्याच्याशी संवाद साधू लागली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक शेअर केले. दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान, २३ एप्रिलला केलवीनने व्हॉट्सअॅप कॉल करून तिला गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यात अमेरिकन डॉलरच्या चलनी नोटा असून भारतात परतल्यानंतर परत घेणार असल्याचे सांगितले. तिने भेटवस्तूसाठी नकार दिला. भेटवस्तू ही नो रिटर्न पॉलिसी या योजनेअंतर्गत पाठविल्याचे सांगितले.
२४ आॅगस्टला अभिनेत्रीला राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. सीमा शुल्क विभागातून बोलत असून पार्सल दिल्ली विमानतळावर आल्याचे तसेच ते घेण्यासाठी शुल्क भरावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. तिने नकार देताच, त्याने कायदेशीर कारवाईची भीती घातली. त्यानंतर तिने ६० हजार भरले. त्यानंतर १ लाख १५ हजार रुपये अतिरिक्त सीमा शुल्क भरावे लागेल, असे सांगून त्याने आणखी पैसे उकळले. त्यानंतरही आणखी पैसे मागितल्याने तिने पोलिसांत तक्रार केली.