Join us

सोशल मीडियावर चर्चा मुंबईच्या हवेची; शहरात पुन्हा मास्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 8:55 AM

शहरातील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या श्वसन विकारांना सामोरे जावे लागत आहे

संतोष आंधळे

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमच मुंबईतील हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालावल्याने आता त्याची चर्चा सोशल मीडियावरही जोरात आहे. सोशल मीडियावर लोकांनी धुरामध्ये हरवलेल्या मुंबईच्या विविध जागा आणि वाटांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच ज्याला ज्याला जशी माहिती मिळत आहे तसतशी तो तिथे टाकत आहे. विशेषतः ही हवा किती घातक आहे आणि काय व कशी काळजी घेता येईल, याच्या पोस्ट आवर्जून पाहायला अन् वाचायला मिळत आहेत. मास्क घाला, असेही आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील सल्ले हे कितीही चांगले असले तरी लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी काही उपाय करू नये, असे डिस्क्लेमर देखील काही डॉक्टरमंडळी देत आहेत. एकीकडे या विषयावर गंभीर चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे काही मंडळींनी लॉकडाऊन काळातल्या प्रदूषणमुक्त मुंबईच्या फोटोंसोबत सध्याचे फोटो टाकले आहेत आणि पुन्हा एकदा छोटा लॉकडाऊन करून मुंबईतली हवा शुद्ध करावी का ? असा मार्मिक प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

मुंबईत पुन्हा मास्क?

शहरातील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या श्वसन विकारांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी या हंगामात विषाणूंचा संसर्ग  होत असतो.  मात्र, यावर्षी दूषित हवेने त्यात भर घातल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास, घसा बसण्याच्या व्याधी इत्यादींनी ग्रासले आहे. कोरोनाची साथ अजूनही सुरूच आहे. आणखी काही काळ असेच वातावरण राहिले तर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे नागरिकांना या काळात स्वसंरक्षण करण्याकरिता मास्क घालणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सद्यस्थितीत प्रत्येकाच्या घरात  सर्दी, खोकल्याचा रुग्ण आढळून येत आहे.  थोड्या दिवसात बरा होणारा हा आजार असला तरी त्या आजाराच्या तीन-चार दिवसांच्या काळात नागरिक आणि लहाने मुले हैराण होऊन जातात. घरगुती उपाय करूनसुद्धा अनेकवेळा ह्या व्याधींपासून सुटका होत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जावे लागत आहे. या खराब वातावरणामुळे विशेष करून श्वसनमार्गाच्या खालच्या आणि वरच्या भागात संसर्ग होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये ताप, खोकला, दमा, अस्थमा, ॲलर्जी आणि न्यूमोनियाच्या व्याधी दिसून येतात. फुप्फुसाच्या कार्यात अडथळा आणणारा आजार (सीओपीडी) आजार अधिक प्रमाणात बळावत असल्याचे दिसून येत आहे.