मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:42 AM2020-01-30T01:42:33+5:302020-01-30T01:42:58+5:30
मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान १९ ते २० अंशादरम्यान स्थिर असले, तरी कमाल तापमानात कमालीची घसरण झाली आहे. कमाल तापमान २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण झाली आहे. कमाल तापमानात घट आणि दिवसाही वाहणारे गार वारे, अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबई आता रात्रीसह दिवसाही गारठली आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या हवामानात झालेले हे बदल गुरुवारी सकाळपर्यंत कायम राहतील. परिणामी, मुंबईकरांचा गुरुवारही गारेगार होणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बुधवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
पालघरमध्ये हलक्या पावसाची नोंद
उत्तर कोकणातल्या पालघरमध्ये बुधवारी हलक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
काही शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणे १३.६
अहमदनगर ११.१
जळगाव १४.४
महाबळेश्वर १३
मालेगाव १५.८
नाशिक १३.९
सांगली १४.७
सातारा १३.५
उस्मानाबाद १२.५
औरंगाबाद १२.७
परभणी १५
अकोला १४.९
बुलडाणा १५.९
नागपूर १४.९