मुंबई तोडण्याचा ‘बेस्ट’चा डाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:14 AM2018-04-01T03:14:09+5:302018-04-01T03:14:09+5:30
गोराई व मनोरी हे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने चक्क हा परिसर मुंबई महापालिकेच्या कक्षेत येत नसल्याचा जावईशोध लावला आहे. गोराई-मनोरी मुंबईत असल्याने नागरिकांसाठी ‘बेस्ट’ने बससेवा द्यावी, अशी विनंती एका नागरिकाने केली असता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बेस्ट प्रशासनाचा हा उफराटा कारभार उघड झाला आहे.
- धीरज परब
मीरा रोड : गोराई व मनोरी हे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने चक्क हा परिसर मुंबई महापालिकेच्या कक्षेत येत नसल्याचा जावईशोध लावला आहे. गोराई-मनोरी मुंबईत असल्याने नागरिकांसाठी ‘बेस्ट’ने बससेवा द्यावी, अशी विनंती एका नागरिकाने केली असता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बेस्ट प्रशासनाचा हा उफराटा कारभार उघड झाला आहे.
मुंबईचा तुकडा पाडू देणार नाही, अशा राणाभीमदेवी थाटाच्या गर्जना शिवसेना नेहमीच करत असते. आता शिवसेनेची सत्ता असलेल्या बेस्ट उपक्रमानेच गोराई, मनोरीला मुंबईबाहेर काढून मुंबईचा तुकडा पाडला आहे.
गोराई, मनोरी ही गावे मुंबई महापालिका हद्दीत येतात. करवसुलीपासून येथील विविध नागरी कामे महापालिकाच करत असते. येथील नगरसेवक, आमदार, खासदारांच्या निवडणुकीचे मतदारसंघ मुंबईतील आहेत. या भागात गोराई बीच, एस्सेल वर्ल्ड, पॅगोडा, मनोरी बीच आदी पर्यटनस्थळे आहेत.
परंतु, मध्ये असलेल्या गोराई खाडीमुळे मुंबईतून या गावांकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने थेट भूमार्गे हा परिसर मुंबईला जोडलेला नाही. गोराई व मनोरी येथे येजा करण्यासाठी पूर्वीपासून फेरीबोट सेवा कार्यरत असल्याने ग्रामस्थ वा पर्यटक प्रवासासाठी फेरीबोटीचा वापर करतात.
गोराई-मनोरी परिसरात रस्तामार्गे जायचे झाल्यास भार्इंदरवरून उत्तनमार्गे जावे लागते.
गोराई व मनोरी तर आत लांब आहे. शिवाय, पर्यटनस्थळांना जायचे झाल्यास वाहनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, पर्यटक व कामानिमित्त येणाऱ्यांना फेरीबोटीनंतर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी बस वा रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तन-गोराई-मनोरी असे प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी बरेच आहेत. भार्इंदर पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेरून बसने थेट गोराई-मनोरी असा नियमित बस प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांची संख्या मोठी आहे.
पूर्वी या परिसरासाठी एसटी महामंडळाची भार्इंदर-गोराईगाव व गोराई-मनोरी अशी बससेवा चालत असे. परंतु, मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहनसेवा सुरू झाल्यावर एसटीने आपली सेवा बंद केली.
मीरा-भार्इंदर महापालिका बससेवा देत असली, तरी या मुंबईतील भागाकडे आता पहिल्यासारखी सेवा दिली जात नाही. गोराई-मनोरीचे नागरिक, विद्यार्थी वा जाणारे पर्यटक हे मीरा-भार्इंदरमधील आपले मतदार नसल्याने येथील नागरिकांना बससेवा देण्यास टाळले जात आहे, अशी चर्चा आहे. बसच्या फेºया कमी करण्यापासून नादुरुस्त, अस्वच्छ बस चालवल्या जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. मुंबई महापालिकेची हद्द असताना आम्ही बससेवा पुरवतो, असा टेंभा मिरवला जातो.
वास्तविक गोराई, मनोरी हा परिसर मुंबई महापालिकेच्या हद्दीत असतानाही बेस्टकडून सेवा पुरवली जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेस्ट प्रशासन सातत्याने येथे बससेवा देण्यास टाळाटाळ करत असून आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत आहे. मुंबईची हद्द ओलांडून ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदरपर्यंत बस चालवणाºया बेस्टला आपल्या हद्दीतील नागरिकांना बससेवा देण्यात काय अडचण आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.
उत्तन येथील रोशन डिसोझा या तरुणाने बेस्ट प्रशासनाकडे बससेवा सुरू करण्याची विनंती करणारे पत्र दिले होते. त्यावर, बेस्टच्या मागाठाणेचे आगार व्यवस्थापक सू.वि. पांचाळ यांनी दिलेल्या पत्रात, गोराई-मनोरी परिसर मुंबई महापालिकेच्या कक्षेत येत नाही, असा जावईशोध लावला आहे.
गोराई-मनोरी मुंबई महापालिकेचा भाग असताना असे उत्तर देणे संतापजनक आहे. हद्द ओलांडून बससेवा देणाºया बेस्टकडून मूळ मुंबईकरांना सापत्न वागणूक दिली जात आहे.
- रोशन डिसोझा, नागरिक