दीडशे रुपयांमध्ये मुंबईचा ‘बेस्ट’ प्रवास
By admin | Published: May 15, 2016 04:18 AM2016-05-15T04:18:00+5:302016-05-15T04:18:00+5:30
सुरुवातीला अवघ्या २५ रुपयांमध्ये मुंबईत कुठेही प्रवासाची स्वस्त व मस्त संधी मिळवून देणारा बेस्ट दैनंदिन पासचा दर दोनशे रुपयांच्या घरात पोहोचला़ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हा प्रवास महाग ठरत
मुंबई : सुरुवातीला अवघ्या २५ रुपयांमध्ये मुंबईत कुठेही प्रवासाची स्वस्त व मस्त संधी मिळवून देणारा बेस्ट दैनंदिन पासचा दर दोनशे रुपयांच्या घरात पोहोचला़ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हा प्रवास महाग ठरत असल्याने अखेर त्यांना बेस्ट दिलासा देण्यात येणार आहे़ त्यानुसार दैनंदिन पास दीडशे रुपयांमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे़
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या गाड्यांमधून सुमारे ३५ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असतात़ आर्थिक संकटात असल्याने बेस्ट उपक्रमाने गेल्या दोन वर्षांमध्ये बस तिकिटांचे दर तीनवेळा वाढविले आहेत़ तरीही खाजगी वाहतुकीच्या तुलनेत हा प्रवास स्वस्त पडत असल्याने आजही मुंबईच्या एका टोकातून दुसऱ्या टोकाला जाताना मुंबईकर बेस्टला प्राधान्य देतात़
कुलाब्यातून दहिसरला जायचे झाल्यास किमान ८०० ते हजार रुपये वाहतुकीसाठी खर्च होत असतात़ बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी अवघ्या २५ रुपयांमध्ये दैनंदिन बसपास सुरू केला होता़ कालांतराने हा पास ६० रुपये असा वाढत वाढत दोनशेपर्यंत पोहोचला़ त्यामुळे दैनंदिन बसपासचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली़ हा प्रवासी वर्ग पुन्हा मिळवण्यासाठी बेस्टने दैनंदिन बसपास दीडशे रुपयांवर आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे़ (प्रतिनिधी)