Join us

अंधेरी, वरळी, विक्रोळीकरांना मिळणार हक्काचे स्वीमिंगपूल, आजपासून ऑनलाइन नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:27 AM

पालिकेकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’.

मुंबई : मुंबई पालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या तरण तलावांची सुविधा आता अंधेरी, वरळी आणि विक्रोळीकरांनाही लुटता येणार आहे. या तरण तलावांसाठी ५ मार्चपासून सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही नोंदणी होणार आहे.

मुंबईकर नागरिकांना पोहणे या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेकडून तरण तलावांची सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेनुसार जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, कोंडिविटा, अंधेरी (पूर्व), वरळी हिल जलाशय परिसर, वरळी आणि राजर्षी शाहू महाराज उद्यानाजवळ, टागोर नगर, विक्रोळी या तीन परिसरातील तरण तलावांसाठी नव्याने ऑनलाइन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली. या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी पालिकेच्या https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या तिन्ही तरण तलावांत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८ हजार ८३६ रुपये इतके वार्षिक सभासदत्व शुल्क आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, पालिका कर्मचारी, निवृत्त पालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात सूट देत रुपये ४ हजार ५८६ रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुषांसाठी या तिन्ही तरण तलावात पोहण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशी असणार आहे.

सभासदांसाठी महत्त्वाचे नियम :

ऑनलाइन पद्धतीने सभासदत्व घेतलेल्या सभासदांनी कागदपत्रे कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

दिव्यांग नागरिकांनादेखील ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याबाबतचे शासनमान्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याशिवाय वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यानच्या सभासदांसमवेत त्या सभासदाची जबाबदारी घेणारे पालक किंवा पालकांनी नियुक्त केलेली व्यक्ती (जिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही) तरण तलावाची सभासद असणे आवश्यक आहे.

अन्यथा सभासदत्व रद्द :

हे सभासद पोहत असताना जबाबदारी घेतलेल्या सभासदाने त्याच्या समवेत तरण तलावात उपस्थित राहणे. जबाबदारी घेणाऱ्या सभासदाव्यतिरिक्त तरण तलावाची सुविधा उपभोगणारा सभासद आढळल्यास त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात येतील.

१)  या तिन्ही तरण तलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिलांसाठी विशेष बॅच असेल. या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी वार्षिक सभासदत्व शुल्क हे ६ हजार ७१६ रुपये इतके आहे.

२) विद्यार्थिनी, ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला, पालिका महिला कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका महिला कर्मचारी आणि महिला नगरसेवक यांनादेखील ४ हजार ५८६ रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापोहणे