मुंबईची तुंबई आणि आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:54 AM2019-07-07T04:54:43+5:302019-07-07T04:56:02+5:30

मुंबई हे जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सध्या ३ कोटी २९ लाख आहे. या शहाराचा विस्तार ...

Mumbai's Challenges after heavy rain | मुंबईची तुंबई आणि आव्हाने

मुंबईची तुंबई आणि आव्हाने

Next

मुंबई हे जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सध्या ३ कोटी २९ लाख आहे. या शहाराचा विस्तार सातत्याने होत असून, क्षितिजीय विस्तारास समुद्रीय सीमांमुळे मर्यादा निर्माण झालेल्या आहेत.


ऐतिहासिक काळापासून मुंबईचे आगळेवेगळे महत्त्व आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांचे हे शहर साक्षीदार आहे. अलीकडे या शहरात होत असलेल्या क्षेत्रीय, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, लोकसंख्या आणि भाषिक बदल झपाट्याने होत असताना दिसत आहेत. क्षेत्रीय बदलानुसार मुंबईचा विस्तार केवळ सात बेटांपुरता नाही, तर तो अलीकडेच घोषित केलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या विकास आराखड्यानुसार पालघर ते अलिबागपर्यंत विस्तारत आहे. त्यामुळे जवळपास हजारो खेडी मुंबईच्या कुशीत सामावली जात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मुंबईचा विस्तार होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये दळणवळणाच्या सुविधा म्हणून अग्रक्रमाने जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतुकीमुळे ऐतिहासिक काळापासून
अनेक उद्योजकांनी या शहराची निवड आपल्या उद्योग-व्यवसाय विस्तारासाठी केली, परंतु आज काळाच्या ओघात शहराची क्षितिजीय वाढ दिवसेंदिवस शहराला बकाल करत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असलेली मुंबई बहुसांस्कृतिकतेचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. काळानुसार भारताच्या विविध राज्यांतून येणारे स्थलांतरितांचे लोंढे शहरातील उपलब्ध पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण करत आहेत. त्यातून शहराच्या समस्या वाढताना दिसतात.


मुंबईची लोकसंख्या वाढ अतिशय वेगाने होत असून, आपण जर मुंबईतील लोकसंख्या वृद्धीचा विचार केल्यास, १९८०-८१ च्या दशकात सर्वाधिक म्हणजे ३८.१ टक्के दराने लोकसंख्या वाढ अनुभवास येते. म्हणजेच १९७०-७१ मध्ये ५९,७०,५७५ असलेली लोकसंख्या १९८०-८१ मध्ये ८२,४३,४०५ इतकी झाली व ३८.१ टक्के या सर्वोच्च पातळीवर लोकसंख्या वाढ झाल्याची अनुभूती मिऴाली.
१९९०-९१ मध्ये हाच लोकसंख्या वाढीचा आकडा २०.४ टक्के, तर २०००-०१ या काळात २०.० टक्के या पातळीवर होता. २०११च्या जनगणनेनुसार १,२४,७८,४४७ इतकी तर प्रक्षेपित आकडेवारीनुसार मुंबई व उपनगरांची लोकसंख्या सुमारे ३ कोटी झाली आहे. अर्थातच उपलब्ध साधनसामग्रीची वृद्धी म्हणजे रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, दळणवळणाची साधने आणि घरांची उपलब्धता मात्र मर्यादित दराने झाल्याचे अनुभवास येते.


२०११च्या जनगणना अहवालानुसार मुंबईची नागरी रचना पाहिली असता, संमिश्र भाषिक समुदायातील लोक मुंबईत वास्तव्य करत असून, जवळपास ५७ टक्के हिंदी भाषिक आणि उर्वरित हिंदी भाषिक नसलेले आहेत. मुंबईच्या धार्मिक रचनेचा अभ्यास केल्यास २०११च्या आकडेवारीनुसार हिंदू लोकसंख्या ८२,१०,८९४ म्हणजेच सुमारे ६५.९९ टक्के, मुस्लीम लोकसंख्या २५,६८,९६१ म्हणजे सुमारे २०.६५ टक्के, बौद्ध ६,०३,८२५ म्हणजे सुमारे ४.८५ टक्के, जैन ५,०९,६३९ म्हणजे ४.१० टक्के, ख्रिश्चन ४,०७,०३१ म्हणजे ३.२७ टक्के, शीख ६०,७५९ म्हणजे ०.४९ टक्के व इतर ४९,४३९ म्हणजे ०.४० टक्के अशी नोंद आहे. यावरून मुंबईतील भाषिक व धार्मिक रचना संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येते.


मुंबईतील भाषिक व धार्मिक लोकसंख्या बदलास मुंबईत इतर राज्यांतून झालेले स्थलांतर हा प्रमुख घटक आहे. त्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार सुमारे ५४ टक्के इतकी असलेली लोकसंख्या झोपडीधारक म्हणून वाढत आहे. त्याचे प्रमाण प्रामुख्याने पश्चिम व मध्य उपनगरात वाढताना दिसून येते. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स २००९च्या अभ्यासानुसार २००५-०६ मधील ४५ टक्के झोपडपट्टीपैकी ५३ टक्के महिला व ४५ टक्के पुरुष (वय १५-४९) यांचे स्थलांतर मुंबईत घडून आले. मुंबईतील सुमारे १.२ दशलक्ष नागरिकांचे म्हणजे सुमारे १० टक्के नागरिकांचे दरडोई उत्पन्न (२००६-७ च्या किमतीनुसार) ५९१.७५ रुपये प्रति महिना आहे.
असे कमी उत्पन्न असल्यामुळे मुंबईत घर घेणे परवडणारे नाही. दिवसेंदिवस वाढणारी घरांची किंमत सामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत सरकारी योजना कितपत उपयोगी ठरतील व अशा मुंबईकरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यास हातभार लागेल, याबाबत साशंकता आहे.


वाढत्या असंघटित क्षेत्रामुळे मुंबईतील उद्योगापेक्षा गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राचा विस्तार कितपत मुंबईच्या दृष्टीने पोषक ठरेल,
हा यक्षप्रश्न आहे. झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण या क्षेत्रात वाढती मागणी शहराचा आकार वाढविण्यास कारणीभूत
ठरत आहे. इतकेच नाही, तर अनेक आजारी उद्योगांनी तो-तो उद्योग पुनजीर्वित करण्यापेक्षा थेट गृहनिर्माण क्षेत्रांची निवड करण्यास
प्रारंभ केला आहे. त्यामुळे नैसर्गिक वातावरणावर अधिकच प्रतिकूल परिणाम होऊन मुंबईत सिमेंटच्या जंगलाचा विळखा वाढत आहे.
पुनर्विकास आणि नव्याने वाढत जाणाऱ्या उंच इमारती हवामान बदलास व मुंबईतील दळणवळण साधनावर अतिरिक्त भार पाडत आहेत. मुंबईत ज्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, म्हणून आकर्षित झालेला पांढरपेशी वाहतूककोंडी आणि दळणवळणात वाया जाणारा वेळ या नवीन समस्येने ग्रासला जात आहे. अनेक अभ्यासकांनी मांडल्याप्रमाणे दिवसागणिक करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान वाढत्या वेळेच्या अपव्ययामुळे होत असून, वाढती गर्दी व वाहतूककोंडी यामुळे मानवी जीवन कवडीमोल होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे वायू, ध्वनी व जलप्रदूषण आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.


अशा परिस्थितीत येणाºया काळात मुंबईकर ज्या एका काळात जीवाची मुंबई म्हणून या शहराकडे आकर्षित होत होता, तो आता नक्कीच पश्चात्ताप करत असून, नव उद्योजक या शहराकडे वाढती महागाई, वाढती गर्दी, वाढती मजुरी व होणारी वाहतूककोंडी यामुळे त्रासला आहे. मुंबई शहराचे विस्तारीकरण लक्षात घेता, येणाºया काळात या शहराची सुरक्षितता व सामाजिक, आर्थिक स्थिरता साधायची असेल, तर नियोजनकर्त्यांनी पुढील किमान २०-३० वर्षांची वाढ व विस्तार विचारात घेऊन शहराचे नियोजन केले पाहिजे, अन्यथा निर्माण झालेली विविध नवनवीन आव्हाने मुंबईच्या अधोगतीस कारणीभूत ठरतील. नियोजनकर्त्यांनी मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न दाखविण्यापेक्षा मुंबईचे गतवैभव प्राप्त करण्यास योग्य नियोजन करावे हीच माफक अपेक्षा.


(लेखक मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी, मुंबई विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)


 - प्रा. डॉ. सुरेश मैंद

Web Title: Mumbai's Challenges after heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.