मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचा सपाटा सुरू झाल्याचे चित्र होते.मुंबई शहर जिल्ह्यांमध्ये २६०० मतदान केंद्रांचा समावेश असून प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्येकी ५ कर्मचारी-अधिकारी याप्रमाणे १३ हजार कर्मचारी व अतिरिक्त कर्मचारी-अधिकारी असे मिळून एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यापैकी बहुसंख्य कर्मचारी मुंबई महापालिका, मंत्रालय, आयकर विभाग, वस्तू व सेवा कर विभाग, रेल्वे अशा विविध राज्य व केंद्र सरकारच्या कार्यालयांतून निवडणुकीच्या कामांसाठी घेण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेकडून सुमारे ३ हजार कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले आहेत.मुंबई शहर जिल्ह्याच्या हद्दीत लावण्यात आलेले विविध राजकीय बॅनर्स तसेच होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या ७ साहाय्यक आयुक्तांकडून या कामगिरीबाबत अहवाल मागविण्यात आला असून शहरातील कोणत्याही भागात एकही अनधिकृत राजकीय बॅनर राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. विविध महामंडळांच्या ताब्यातील ५५ वाहने निवडणुकीच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी, अधिकारी यांची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जमा करण्यात आली असून यामधून कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या जागी नियुक्त करायचे याचा निर्णय थेट निवडणूक आयोगाचे अधिकारी घेतील, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हादंडाधिकारी संपत डावखर यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी, साहाय्यक अतिरिक्त निवडणूक अधिकारी यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसीलदार या पदांवरील अधिकाºयांची नेमणूक केली जाणार आहे.निवडणूक प्रक्रियेबाबत अधिकाºयांमध्ये कोणतीही शंका राहू नये यासाठी त्यांच्यासाठी माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली असून त्याचे वाटप केले जात आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठीदेखील पुस्तिका तयार करण्यात आली असून लवकरच त्यांचे वाटप करण्यात येणार आहे.आज राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांसोबत बैठकनिवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात तसेच कोणत्या बाबी कराव्यात, कोणत्या बाबी टाळाव्यात याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 5:50 AM