‘पैठणी’च्या कंदिलांची मुंबईकरांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:40 AM2019-10-24T01:40:58+5:302019-10-24T01:41:23+5:30
प्लास्टीकबंदीमुळे इकोफ्रेंडली आकाशदिव्यांना मागणी
मुंबई : निवडणुकीमुळे दिवाळीची खरेदी थोडी उशिराच सुरू झाली़ तरीही यंदा पैठणी साड्यांची जोड देत बनविलेले नावीन्यपूर्ण कंदील ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहेत. राज्य शासनाने सिंगल यूज प्लास्टीकबंदी केल्यानंतर त्याचा फटाका कंदिलांनाही बसला आहे. इकोफ्रेंडली कंदिलांनी मुंबईतल्या बाजारापेठा सजल्या आहेत. रंगीबेरंगी कंदील हे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दादर मार्केटमधील कंदील विक्रेते दशरथ कुंभार म्हणाले की, आमच्याकडे इकोफ्रेंडली कंदील उपलब्ध आहेत. कापड, कागद आणि बांबूपासून कंदील बनविले जातात. बाजारात इकोफ्रेंडली २५०-३०० आणि बांबूच्या काठ्यांपासून बनविलेले कंदील ६०० ते ७०० रुपयांपर्यंत, तसेच चायना कंदील हा १५० ते ४५० रुपयांपर्यंत विकला जातो. बांबूच्या कंदिलांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी
आहे.
कागद आणि लाकूड अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून, राजश्री, तेजोमय, मयूर, नभोमणी, अरण्या, अनन्या, गुलकंद, नक्षत्र अशा नावांचे कंदील तयार केले जातात. आम्ही पर्यावरणपूरक कंदील बनवत असून, गेल्या वर्षी कंदिलांना जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट केली होती आणि यंदा पैठणी साड्यांचे पहिल्यांदाच वेगळे कंदील बनविण्यात आले आहेत.
नक्षत्र कंदील लहान स्वरूपाचा असून, त्यासाठी विविध रंगीबेरंगी कागदांचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती हर्षाभि क्रिएशन्सचे अभिषेक साटम यांनी दिली.
कंदिलांमध्ये आकाश कंदिलाच्या पॅटर्नमध्ये पंखा, नेकलेस आणि मोर यांचा ट्रेण्ड मार्केटमध्ये सुरू आहे. ग्राहकांकडून आकाशकंदिलांना सर्वाधिक मागणी आहे. कंदिलांचे मार्केट चांगले असून ग्राहकांची कंदील खरेदीला झुंबड उडते. परंतु पाऊस सुरू झाल्यावर गर्दी कमी होते. प्लास्टीक बंदीमुळे इकोफ्रेण्डली कंदील बाजारात जास्त उपलब्ध आहेत.
- गौरव सावंत, कंदील विक्रेते, माहिम कंदील गल्ली