Join us

मुंबई क्रिकेटचा दर्जा खालावला - संदीप पाटील

By admin | Published: October 29, 2015 12:25 AM

मुंबईतील क्रिकेटचा दर्जा सध्या खालावला आहे. खेळाचे राजकारण झाले असल्यामुळे आज मुंबई क्रिकेटला खेळाडूंची कमतरता भासत आहे.

मुंबई : मुंबईतील क्रिकेटचा दर्जा सध्या खालावला आहे. खेळाचे राजकारण झाले असल्यामुळे आज मुंबई क्रिकेटला खेळाडूंची कमतरता भासत आहे. त्यामुळेच केवळ शिवाजी पार्क जिमखानाच नाही तर मुंबईतील सर्वच क्रिकेट क्लबने एकत्रित येऊन मुंबई क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निव्ड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.शिवाजी पार्क जिमखान्याच्या (एसपीजी) वतीने पाटील यांच्या निदर्शनाखाली क्रिकेट अकादमीला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात बुधवारी माहिती देताना पाटील यांनी आपले परखड मत व्यक्त केले. विशेष म्हणजे शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सुरू होणाऱ्या या क्रिकेट अकादमीमध्ये १४-१६ वयोगटातील खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून या अकादमीत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंची १६ नोव्हेंबरला निवड चाचणी घेण्यात येईल. या चाचणीतून एकूण २५ खेळाडूंची निवड होणार असून या खेळाडूंना नव्या अकादमी अंतर्गत प्रशिक्षण मिळेल.दरम्यान, यावेळी सध्याच्या मुंबई रणजी संघातील शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, श्रेयश अय्यर आणि हरमीत सिंग यांचीही विशेष उपस्थिती होती. मुंबईतील क्रिकेटचा विस्तार खूप मोठा झाला आहे. पूर्वी खेळाडू एका क्लबशी बांधले गेलेले असायचे. मात्र आज एकाचवेळी अनेक क्लबमधून खेळाडू खेळत असतात, असेही पाटील म्हणाले.पाटील यांनी एसपीजीचे आभार मानताना सांगितले की, मी आज जो काही यशस्वी झालो तो एसपीजीमुळे. शिवाजी पार्क केवळ मैदान नसून ती क्रिकेटपटूंची खाण आहे. येथूनच भारतीय क्रिकेटला चमकदार खेळाडू लाभले. एसपीजीचा माझ्या कारकिर्दीमध्ये खूप मोठा वाटा आहे. अन्यथा मी मुंबई क्रिकेटमध्ये चमकलो नसतो. मुंबई क्रिकेटचा एक सहभाग असल्याचा मला अभिमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)