मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात भरविण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनाला पाहण्यासाठी नागरिकांनी लावलेली रीघ म्हणजे, महापालिका मुंबईकरांना अविरत पुरवित असलेल्या नागरी सेवा-सुविधांना दिलेली पावती आहे, असे उद्गार उपमहापौर अलका केरकर यांनी काढले. या पुष्प प्रदर्शनाला सुमारे १ लाख नागरिकांनी भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.महापालिकेचे उद्यान खाते व वृक्ष प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचा सांगता समारंभ अलका केरकर यांच्या उपस्थितीत रविवारी भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. २० वर्षांपासून हे प्रदर्शन भरविण्यात येते. दर वर्षी प्रदर्शनात नावीन्य असते. या वर्षीच्या तीन दिवसीय प्रदर्शनात कल्पकता प्राधान्याने दिसून आली, असेही केरकर यांनी नमूद केले. प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळा स्पर्धेत पश्चिम रेल्वेला प्रथम पारितोषिक व मध्य रेल्वेला द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना उपमहापौरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पाहण्यास मुंबईकरांची गर्दी
By admin | Published: February 16, 2016 3:05 AM