मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या लालबाग मार्केटला सुमारे ३५ कोटी रुपयांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:35 PM2020-05-21T18:35:05+5:302020-05-21T18:35:34+5:30
कोरोनामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून संपुर्ण लालबाग मार्केट बंद आहे.
मुंबई : मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून लालबागची ओळख आहे. कोणतीही खरेदी-विक्री करायची झाली तर मुंबईकर आणि बाहेरगावचे ग्राहक लालबाग येथे दाखल होतात. मात्र यावेळी कोरोनामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून संपुर्ण लालबाग मार्केट बंद आहे. तब्बल अडीच महिने लालबाग मार्केट बंद असल्याने या बाजारपेठेस सुमारे ३५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कोरोनामुळे येथील व्यापारी वर्गाला कसा फटका बसला आहे. त्याचे काय नुकसान झाले आहे. व्यापारी नेमका काय विचार करत आहेत. आणि भविष्यात काय होऊ शकते? या सर्व मुद्यांवर लालबागकरांच्या मदतीने ‘लोकमत’ने लालबाग मार्केटमधील व्यापारी वर्गाशी खास संवाद साधत त्याचे बाजारपेठेवरील म्हणणे लक्षात घेतले आहे. अशाच काहीसा लालबाग बाजारपेठेचा खास रिपोर्ट ‘लोकमत’ च्या वाचकांसाठी.
लाडू सम्राचे कमलाकर राक्षे यांनी सांगितले की, गुढीपाडव्याच्या अगोदरपासून लॉकडाऊन लागू आहे. आम्ही सण असल्यामुळे तयारी केली होती. ३०० किलो श्रीखंडाची तयारी केली होती. मात्र नंतर ते फेकून द्यावे लागले. ७० ते ८० किलो मिठाई तयार होती. मात्र तीदेखील आम्हाला फेकून द्यावी लागली. भारतमाता सिनेमाचे मालक किरण भोपटकर यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या वीज बिलाचा जरी विचार केला तरी महिन्याला लाखो रुपये वीज बील येते. आता अडीच तीन महिने झाले. आम्हाला लाखो रुपयांचे वीज बील भरावे लागते आहे. शिवाय प्रोजेक्टर मशीन पडून आहे. त्यामुळे वापराविना ते खराब होण्याची भीती आहे. भाड्याचे मशीन असतील तर त्याचे भाडे भरावे लागते. कर्ज काढून घेतले असेल तर त्याचे हप्ते भरावे लागतात. थिएटरमधील बैठक व्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे. रेती आणि सिमेंटचे व्यावसायिक पारस गुप्ता यांनी सांगितले की एप्रिल आणि मे महिन्यात मुलांना रजा असते. परिणामी लोक घरकामे हाती घेतात. रेती, सिमेंटसारख्या बांधकाम साहित्याची मागणी वाढते. परिणामी आम्ही मार्च महिन्यात साहित्य मागवून ठेवले होते. मात्र नेमके याच काळात लॉकडाऊन लागू झाले; आणि आमचा व्यावसाय करण्याचा काळ वाया गेला आहे.
नॅशनल ड्रेसचे मालक झेनुलभाई यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल आणि मे हे दोन महिने लग्नसराईचे असतात. फेटे, सदरे अशा ऑर्डर बुक होतात. मात्र यावेळी सगळे वाया गेले आहे. महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा यावेळी ग्राहक ऑर्डर देतात. मात्र यावेळी काहीच झाले नाही. सगळे साहित्य वाया गेले आहे. हे साहित्य पुढच्या वर्षीपर्यंत सांभाळावे लागेल. तोपर्यंत परिस्थिती काय असेल काहीच माहित नाही. खामकर मिरचीवालेचे अमर खामकर यांच्या म्हणण्यानुसार, पुणे, नाशिकहून मार्च, एप्रिल महिन्यात मसाले बनविण्यासाठी ग्राहक येतात. आम्ही सर्व खरेदी करून ठेवतो. मात्र यावेळी सर्व हंगाम वाया गेला आहे. लॉकडाऊनमुळे आता नुकसान झाले आहे. आता पावसाळा सुरु होईल; आणि मिरची खरेदीला कोणी येणार नाही. परिणामी आमचा कच्चा माल वाया गेला आहे. तेजुकाया येथील चरण स्पर्शवाले येथे पादत्राणे विकली जातात. गिरिश रुपानी यांनी सांगितले, एप्रिल आणि मे आमच्यासाठी मोठे हंगाम असतात. कारण यावेळी लग्नसराई असते. यावेळी ग्राहक मोठी खरेदी करतात. याची खरेदी आम्ही फेब्रूवारी महिन्यात करून ठेवतो. मात्र आता मोठे नुकसान झाले आहे. शिवाय पावसाळी पादत्राने यांची मागणी असते. मात्र आता पावसाळी पादत्राने याची खरेदी झाली नाही. अतोनात नुकसान झाले आहे.
पतंगे कलेक्शनचे संतोष पतंगे यांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे लग्नसराईसाठी सदरा, तयार शर्टसाठी मागणी असते. मात्र यंदा सर्व खरेदी-विक्री हंगाम वाया गेले आहेत. पावसाळ्यात काय होणार? याची चिंता आहे. गणेशोत्सवात काय होणार? याचीही चिंता लागून राहिली आहे. लॉकडाऊन कधी उठणार. पुढे काय होणार. झालेले आर्थिक नुकसान कसे भरून निघणार? असे सगळे प्रश्न पडले आहेत. आनंद नकाशे हे पुजा, लग्न साहित्य विकतात. त्यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई मोठी असते. यावेळी मोठया प्रमाणावर साहित्य खरेदी केली जाते. याची खरेदी आम्ही फेब्रूवारीमध्ये केली. मात्र यावेळी सगळे वाया गेले. आता हे साहित्य आपणाला श्रावणापर्यंत सांभाळून ठेवावे लागणार आहे.
---------------------
लालबागची पूर्वीची ओळख गिरणगाव होती. ती कालांतराने पुसली गेली. संपानंतर गिरणगाव उद्धवस्त झाले. आणि ती ओळख पुसली गेली. मात्र लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया ही येथील ओळख आहे. गणेशोत्सव मंडळानी येथील संस्कृती जपली. आता गिरणगाव ही ओळख पुसली गेली असली तरी सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेली ओळख कायम आहे. आणि मुंबईचे सांस्कृतिक केंद्र हे लालबागच राहील. त्या अनुषंगाने साजरे होणारे सण, उत्सव याची एक मोठी बाजारपेठ लालबाग येथे आहे.
- रुद्रेश सातपुते, लालबागकर