Join us

Kisan Long March : मुंबईच्या डबेवाल्यांचा बळीराजाच्या मोर्चाला पाठिंबा, रोटीबँकेतून अन्नही पुरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 8:35 AM

मुंबईचे डबेवाले शेतकऱ्यांच्या पाठिशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन सुभाष तळेकर यांनी केले.

मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतक-यांचा लाँग मार्च मुंबई दाखल झाला असून लाल बावटा हाती घेतलेले हे वादळ आज विधानभवनावर धडकणार आहे. शेतकरी आझाद मैदानातही दाखल झाले आहेत. शेतक-यांच्या या लाँग मार्चाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.  बळीराजाच्या लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे. रणरणत्या उन्हात आणि भीषण विषम परिस्थितीतही शेतकरी हजारोंच्या संख्येने आपल्या मागण्या शासनदरबारी मंजूर करून घेण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकांना प्रवासात दुखापतीदेखील झाल्या आहेत.फडणवीस सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अद्याप केली नसून,शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात असंवेदनशिलता दाखविली आहे, असे सांगत मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी मुंबईच्या डबेवाल्यांनी शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती दिली. 

''आम्ही डबेवाल्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू शकू असे आम्हाला वाटते. शेतकरी लाँग मार्चला पाठिंबा दर्शविताना डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर रविवारी रात्री 11 वाजता सोमय्या ग्राऊंडवर हजारो शेतक-यांना संबोधताना ते बोलत होते. ते पुढे असंही म्हणाले की, डबेवाला जरी मुंबईत काम करत असला तरी त्याचा मुळात पिंड हा शेतक-यांचाच आहे. त्याचे वडील किंव्हा भाऊ हा गावी शेतीच करत असतो त्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या घरात शेती आहे व शेतीच्या समस्या काय आहेत यांची आम्हाला चांगली कल्पना आहे. मुंबईचे डबेवाले शेतकऱ्यांच्या पाठिशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन सुभाष तळेकर यांनी केले.

रोटी बँकेची मोर्चाला अनोखी मदत मुंबईचे डबेवाले रोटी बँक चालवतात.या बँकेच्या माध्यमातून हजारो भुकेल्यांना डबेवाले दररोज अन्न पुरवठा करतात. आजदेखील या रोटी बँकेच्या माध्यमातून आझाद मैदान येथे शेतक-यांना अन्न वाटप केले जाणार आहे. मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या सर्वांना अन्न वाटप करणे आम्हाला शक्य नाही. पण यातील काही जणांना आम्ही अन्न वाटप करणार आहोत. या कामात खारीचा का होईना आमचा वाटा निश्चित असेल, असेही सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :किसान सभा लाँग मार्चमुंबई डबेवालेशेतकरी