लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गुरुवारी ५१वा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्थापना दिन साजरा केला. यानिमित्ताने कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज एनएसएस विभागाने गुरुवारी मुंबईच्या डबेवाल्यांना धान्य वाटप केले. तसेच मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन योगा प्रशिक्षण घेतले.सध्या रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद झाली आहे. तसेच बहुतेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने डबेवाल्यांची सेवाही ठप्प झाली आहे. यासाठीच डबेवाल्यांना मदतीचा हात देण्यासाठी एनएसएसचे स्वयंसेवक सरसावले.ठाकूर कॉलेजसह मेकिंग दी डिफ्रन्स आणि डोनेट कार्ड या संस्थांच्या मदतीने झालेल्या या उपक्रमाद्वारे सुमारे १२०० डबेवाल्यांना धान्य वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ एनएसएस कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर आणि ठाकूर महाविद्यालय एनएसएस कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्या मार्गार्शनाखाली विद्यार्थ्यांनी उपक्रम यशस्वी केला. यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे कार्याध्यक्ष सोपान मरे यांनीही एनएसएस विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मुलुंडच्या व्ही. जी. वझे महाविद्यालयात एनएसएस दिनानिमित्त ओयोजित करण्यात आलेल्या योगा उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा, उपप्राचार्य डॉ. प्रीता निलेश आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रसन्नजीत भावे आणि इतर शिक्षकांंच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात निलेश साबळे यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. ‘आज लॉकडाऊनमध्ये अनेकांचा मानसिक तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी सर्वांनीच योगाचा मार्ग निवडावा,’ असे साबळे यांनी सांगितले.
मुंबईच्या डबेवाल्यांना मिळाली एनएसएस स्वयंसेवकांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:33 AM