Join us

दररोज २५ ते ३० किलोमीटर सायकल चालवत असल्याने मुंबईचे डबेवाले आजारांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

ओमकार गावंडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, यासाठी व्यायाम व योगासने यांना विशेष महत्त्व प्राप्त ...

ओमकार गावंड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, यासाठी व्यायाम व योगासने यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी अनेकजण सायकलही चालवू लागले आहेत. मात्र, मुंबईच्या डबेवाल्यांसाठी त्यांची सायकल हेच त्यांचे जीवन आहे. सायकलवरच संपूर्ण रोजगार अवलंबून असल्याने त्यांच्या आयुष्यात सायकलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईतील सुमारे साडेचार हजार डबेवाले डबे पोहोचविण्यासाठी सायकलचा वापर करतात. दररोज २५ ते ३० किलोमीटर सायकल चालविल्यामुळे वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही मुंबईचे डबेवाले तंदुरुस्त आहेत. दररोज सायकल चालविल्यामुळे डबेवाले उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार यासारख्या आजारांपासून दूर आहेत.

घरातून निघाल्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत डबेवाल्यांचा प्रवास सायकलने होतो. डबा लोकलमधून घेऊन इच्छित स्थळी उतरल्यावर पुन्हा एकदा डबा पोहोचविण्यासाठी डबेवाला सायकलने प्रवास करतो. या दररोजच्या सायकल वारीमुळे इंधनाची बचत तर होतेच यासोबत पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे शरीरदेखील तंदुरुस्त राहते. यामुळे सर्वांनीच आपल्या दररोजच्या प्रवासात जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, असा संदेश मुंबईचे डबेवाले देत आहेत.

सुभाष तळेकर (अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोशिएशन )

इतर लोक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल चालवतात, मात्र आमच्यासाठी रोजचा दिवस हा सायकल दिवस असतो. सायकल आमचे उपयुक्त वाहन आहे. सायकलची किंमत कमी असते आणि डबेवाल्यांना ती सहज विकत घेता येते. आजही बबन वाळंज यांच्यासारखे पंच्याहत्तरी पार केलेले शेकडो डबेवाले एकदम तंदुरुस्त राहून मुंबईत कार्यरत आहेत. त्यामागे सायकल हे एकमेव कारण आहे. हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमानवाढीचे प्रकार घडतात. आज पेट्रोल शंभरी पार गेले आहे. मात्र, सायकल ही इंधनाविना चालते. देखभालीचा खर्च अगदी नगण्य आहे. कोणत्याही वायूचे उत्सर्जन न केल्याने ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे लोकांना आमचे हेच सांगणे आहे की, तुम्ही दररोज सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि सर्व आजारांपासून मुक्त राहा.

सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची गरज

सायकल चालविण्याचे आरोग्यदायी आणि पर्यावरणीय फायदे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हल्ली तरुणांमध्ये सायकलिंगबद्दल प्रेम वाढत आहे. परंतु, सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची राजकीय इच्छाशक्तीही आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे, असे डबेवाल्यांचे म्हणणे आहे.

..................................................................