लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयातही रुग्णांना वेळेत बेड मिळत नसल्याचे चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून कामधंदा गमावून बसलेले मुंबईचे डबेवाले जनसेवेसाठी पुढे आले असून, त्यांनी आळंदी, पुणे येथील धर्मशाळा कोरोना केअर सेंटरसाठी देण्याचा इच्छा व्यक्त केली आहे. तसे पत्रच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे.
मुंबईचे डबेवाले १३० वर्षांपासून मुंबईत घरच्या जेवणाचे डबे शाळा व कार्यालयांत पोहोचविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनीही घेतली. कोरोना महामारीमुळे प्रथमच डबेवाल्यांच्या या व्यवसायावर परिणाम झाला. तरीही या महामारीच्या संकटात मदत म्हणून डबेवाल्यांच्या आळंदी येथे असणाऱ्या धर्मशाळेचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतल्याचे डबेवाले संघटनेने घेतल्याचे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले. येथे जवळपास १०० ते १५० रुग्णांवर उपचार करता येतील एवढी जागा उपलब्ध आहे. शिवाय इतर प्राथमिक सुविधाही येथे उपलब्ध असल्याचे शेटे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना रक्ताची गरज असताना मुंबईतील जेवण डबे वाहतूक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचशेहून अधिक रक्ताच्या बाटल्या गोळा केल्या होत्या. आताही राज्यात बेडची संख्या अपुरी पडत असल्याने सरकारने आमच्या या निर्णयाचा सकारात्मक विचार करून पुन्हा एकदा जनसेवा करण्याची संधी शासनाने डबेवाल्यांना द्यावी अशी इच्छा मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी व्यक्त केली.
..........................