शाब्बास मुंबईकर! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठं यश; तब्बल २२ महिन्यांनंतर पहिल्यांदाच असं घडलं
मुंबई: कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. जानेवारीत तिसऱ्या लाटेनं टोक गाठलं होतं. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे ९६ नवे रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.
मुंबईत गेल्या २४ तासांत १८८ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. १७ एप्रिल २०२० रोजी मुंबईत १०० पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कधीच मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्या खाली गेली नाही. मात्र आता २२ महिन्यांनंतर प्रथमच शहरात १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली.
मुंबई लवकरच निर्बंधमुक्त?मुंबईत लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता आहे. लोकल प्रवास, मॉलमध्ये सध्या लसीकरण प्रमाणपत्र पाहिलं जातं. त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मुंबईत लागू असलेले निर्बंध मागे घ्यायला हवेत. कोरोना काळात प्रशासनानं चांगलं काम केलं. मग आता परिस्थिती नियंत्रणात असताना निर्बंध कायम ठेवून राज्याला उगाच का बदनाम करताय, असा सवाल न्यायालयानं विचारला. याबद्दल विचार करून लवकर निर्णय घ्या, अशी सूचना न्यायालयानं सरकारला केली आहे.