लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येथील कर्जवसुली लवाद (डीआरटी) अधिकाऱ्याला सोमवारी सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. बी. एस. माने असे अधिकाऱ्याचे नाव असून ग्राहकाचा चांगला अहवाल पाठविण्याच्या नावाखाली त्याने ७ लाखांची लाच घेतली होती. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या एका ग्राहकाबाबत चांगला अहवाल पाठवून त्यांची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी वसुली अधिकारी माने याने ७ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम चेकच्या स्वरूपात त्याचा साथीदार विजयकुमार याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने याबाबत सीबीआयकडे धाव घेतली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने विजयकुमारकडे चेक दिला. सीबीआयने या प्रकरणी सापळा रचून दोघांनाही बेड्या ठोकल्या. दोघांनाही लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही २८ तारखेपर्यंत कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. बी.एस. माने याने यापूर्वीही अशी लाच घेतली होती का? याबाबतही सीबीआयने अधिक तपास सुरू केला आहे.
मुंबईचा कर्जवसुली अधिकारी अडकला सीबीआयच्या जाळ्यात
By admin | Published: June 27, 2017 3:48 AM