मुंबईचा विकास आराखडा येत्या फेब्रुवारीपर्यंत: मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:36 AM2017-10-11T04:36:51+5:302017-10-11T04:37:21+5:30
मुंबई शहरासाठी फेब्रुवारी-मार्च २०१८ पर्यंत नवा विकास आराखडा लागू केला जाईल. मुंबईच्या सौंदर्यवृद्धीबरोबरच येथील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी येत्या एक महिन्यात नागरी कला आयोगाची स्थापना करण्यात येईल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई शहरासाठी फेब्रुवारी-मार्च २०१८ पर्यंत नवा विकास आराखडा लागू केला जाईल. मुंबईच्या सौंदर्यवृद्धीबरोबरच येथील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी येत्या एक महिन्यात नागरी कला आयोगाची स्थापना करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.
आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या अहवाल प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मोकळ्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या दृष्टीने फाउंडेशनने तयार केलेला अहवाल निश्चितच दिशादर्शक असून नगरविकास धोरणात त्याचा निश्चित अवलंब केला जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, शहरांचे विकास आराखडे पूर्वी लवकर मान्य होत नसत. पण शासनाने मागील काही काळात ७१ नगरविकास आराखड्यांंना मान्यता दिली आहे. मुंबईच्या विकास आराखड्यासही येत्या ६ महिन्यात मान्यता देण्यात येईल. फेब्रुवारी - मार्चपर्यंत मुंबईला नवा विकास आराखडा मिळेल. विकास आराखडा हे फक्त दस्तावेज न राहता त्याची अंमलबजावणी होण्यावर आम्ही भर देत आहोत. आझाद मैदान, आॅगस्ट क्रांती मैदानाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन निश्चित पुढाकार घेईल. मुंबई महापालिकेला आपण यासंदर्भात सूचना देऊ, असे ते म्हणाले.
फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांचे भाषण झाले. फाऊंडेशनचे गौतम किर्तने, सायली उदास - मानकीकर, द्वीप राछ आदी उपस्थित होते.