मुंबई: धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअएंटचा शिरकाव झाला आहे. आज धारावीत ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. पूर्व आफ्रिकेतून परतलेल्या एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं धारावीकरांची चिंता वाढली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात येईल. त्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टांझिानियाहून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं चाचणीतून समोर आलं. विमानतळावर त्याला घेण्यासाठी दोन जण आले होते. टांझानियाहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या जी उत्तर विभागाला देण्यात आली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांशी संपर्क साधला. रुग्णावर सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यानं लस घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २५ वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. देशात आढळलेल्या बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं आहेत. राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ११ वर पोहोचली आहे. राजस्थानात ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.