Join us

मुंबईकरांची डिजिटल दिवाळी; टेक्नोसॅव्ही शुभेच्छांचा वर्षाव, ध्वनिप्रदूषणाचा आवाज मोजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 1:41 AM

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम संपताच मुंबईकरांना वेध लागले ते आनंदाचा क्षण असलेल्या दिवाळीचे; आणि याच निमित्ताने लक्ष लक्ष दिव्यांनी सजलेल्या दाही दिशांमुळे जणूकाही मुंबई उजळूनच निघाली. सर्वदूर पसरलेला अंधकार दूर करत कोपरा नि कोपरा प्रकाशानेच तेवत असतानाच मुंबईकरांनी एकमेकांना टेक्नोसॅव्ही अशा डिजिटल शुभेच्छा देत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खमंगदार फराळाने एकमेकांचे तोंड गोड केले आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडेही वाटचाल केली.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळा संपताच वातावरण आणखी प्रदूषित होण्यास सुरुवात होते. मुंबईकरांनाही काहीशा प्रमाणात याचा प्रत्यय येतो. म्हणूनच की काय पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सुमेरा अब्दुल अली यांच्या‘आवाज फाउंडेशन’कडून आवाहन करण्यात येते.

विशेषत: दिवाळीदरम्यान वाजविण्यात येत असलेल्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याने आवाज फाउंडेशनकडूनजनजागृती केली जाते. आवाज फाउंडेशनकडून पश्चिम उपनगरासह शहरात म्हणजे वरळी आणि वांद्रे परिसरासह ठिकठिकाणीदिवाळीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण मोजण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी. नागरिकांना आवाजाचा त्रास होऊ नये; हा एकमेव उद्देश यामागे असून, मुंबईकरही पर्यावरणपूरक दिवाळीला हातभार लावत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातठिकठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठा फुलल्या होत्या. फटाक्यांची खरेदी करण्यासह नवी वस्त्रे आणि आभूषणे खरेदीकरण्यासाठी मुंबईकरांची दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लगबग सुरू होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरासह सर्वत्र दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जल्लोष सुरू असतानाच रांगोळी प्रदर्शनासह दिवाळी पहाटचेही आयोजन करण्यात आले होते.

याव्यतिरिक्त दिवाळीदरम्यान लहानग्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा याकरिता गिरगाव, कुर्ला, अंधेरीमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चाळींसह इमारतींमधील घरासमोरीची जागा रांगोळीसह पणत्यांनी सजलीअसतानाच पहाटेपासून ठिकठिकाणी आतषबाजीही सुरू होती. दिवाळी पहाट उत्साहाने उजाडत असतानाच खमंग फराळाने एकमेकांचे तोंडही गोड केले जात होते. दिवाळीचा उत्साह वातावरणात संचारला असतानाच लक्ष्मीपूजनाने दिवाळीचे मंगलमयवातावरण बहरून निघत होते.

टॅग्स :दिवाळी