थंडीविना साजरी झाली मुंबईकरांची दिवाळी; राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 02:17 AM2019-10-30T02:17:19+5:302019-10-30T02:17:34+5:30

क्यार मुंबईपासून १ हजार किलोमीटर दूर

Mumbai's Diwali celebrated without cold; Precipitation rains persist in the state | थंडीविना साजरी झाली मुंबईकरांची दिवाळी; राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम

थंडीविना साजरी झाली मुंबईकरांची दिवाळी; राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम

Next

मुंबई : दरवर्षी ऐन कडाक्याच्या थंडीत दिवाळी साजरी करत असलेल्या मुंबईकरांनी या वर्षीची दिवाळी मात्र थंडीविना साजरी केली. कारण अरबी समुद्रात निर्माण झालेले क्यार नावाचे चक्रीवादळ, लांबलेला परतीचा पाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे ऑक्टोबरमध्ये न जाणवलेला उकाडा; अशा संमिश्र वातावरणामुळे यंदाच्या दिवाळीत मुंबईकरांना थंडी जाणवलीच नाही.

अरबी समुद्रात निर्माण झालेले क्यार नावाचे चक्रीवादळ आता मुंबईपासून १ हजार १० किलोमीटर दूर गेले असून, वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईवरील मळभही दूर झाली आहे. राज्यात मात्र तुरळक ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य-पूर्व अरबी समुद्रातील क्यार महाचक्रीवादळाचे रूपांतर अति तीव्रचक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ आता पश्चिम-मध्य आणि लगतच्या मध्य-पूर्व व उत्तर अरबी समुद्रावर आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

ऑक्टोबर सरत आला ‘हिट’शिवाय
मुंबई शहर आणि उपनगरावर महिनाभर मळभ पसरले होते, शिवाय ठिकठिकाणी पावसाच्या सरीही कोसळत होत्या. विशेषत: क्यार चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकणात वातावरण ढगाळ आणि पाऊससदृश्य होते. परिणामी, आॅक्टोबर महिन्यात किंचित एक ते दोन दिवस पडलेले कडाक्याचे ऊन वगळता आॅक्टोबर महिनाही हिटविनाच सरत आल्याचे चित्र आहे.

राज्यासाठी अंदाज
३० ऑक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.
३१ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

आता ‘माहा’ नावाचे चक्रीवादळ येणार
हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय घडामोडींमुळे आता अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ तयार होणार आहे. ते तयार झाल्यास त्याचे नाव ‘माहा’ असे असेल. ‘वायू’, ‘हिक्का’ आणि ‘क्यार’ या तीन चक्रीवादळांनंतर अरबी समुद्रात निर्माण होणारे ‘महा’ हे चौथे चक्रीवादळ असेल. हे चक्रीवादळ ‘क्यार’प्रमाणे ओमनच्या दिशेने पुढे सरकेल. सध्याच्या माहितीनुसार, ‘महा’ चक्रीवादळाचा भारताला फटका बसणार नाही. मात्र यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये पाऊस पडेल.

Web Title: Mumbai's Diwali celebrated without cold; Precipitation rains persist in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.