मुंबईच्या नालेसफाईचे आव्हान; सुरुवात विलंबाने, कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालिकेला टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:59 AM2024-03-23T10:59:29+5:302024-03-23T11:00:42+5:30
पालिकेकडून दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला सुरू होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाली आहे.
मुंबई : पालिकेकडून दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला सुरू होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाली आहे. त्यातच रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा प्रमुख विभागातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार असल्याने या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र, पावसाळ्याआधी नालेसफाईचे टार्गेट पालिकेला पूर्ण करायचे असल्याने पालिकेची यंदाची नालेसफाई म्हणजे आव्हान असणार आहे. दरम्यान पालिकेची कामे सुरू झाली असून यंत्रणा नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहे. त्यामुळे येत्या १५ मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन निश्चित करेल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरवर्षी मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. ३१ मे अखेरपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण होणे आवश्यक असते.
१) यंदा विविध भागांत नालेसफाईला मुहूर्तही मिळाला नसल्याने ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
२) मुंबईत छोटे मोठे अनेक नाले असून ही कामे कंत्राटदारांच्या माध्यमातून होत असली, तरी देखरेख ठेवण्यासाठी पालिकेकडे कर्मचारीच नसल्याने पालिकेला यासाठी निर्णायक पाऊल उचलावे लागणार आहे.
३) दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते. मात्र, २०२२ मध्ये नालेसफाई ११ एप्रिल रोजी सुरू झाली होती.
४) यावेळी काम पूर्ण करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. २०२३ मध्ये ६ मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते.
५) यावर्षी तिसऱ्या आठवड्यांतर काम सुरू झाल्यामुळे टार्गेट गाठण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे. मिठी नदीचे काम सुरू झाले असून ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नालेसफाई ही पुढच्या २ महिन्यांत पूर्ण करू, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
परिसर नाल्यांची संख्या अंतर
मुंबई शहर २७ २१.९७ किमी
पूर्व उपनगर १११ १०२.१ किमी
पश्चिम उपनगर १४२ १३९.८४ किमी