मुंबईतील नाले ५० दिवसांत गाळमुक्त! आतापर्यंत १२ टक्के नालेसफाई; कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:24 IST2025-04-12T11:22:03+5:302025-04-12T11:24:40+5:30
Mumbai News: मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा.

मुंबईतील नाले ५० दिवसांत गाळमुक्त! आतापर्यंत १२ टक्के नालेसफाई; कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना
मुंबई - मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर पावसाळ्यातही विविध प्राधिकरणांशी संपर्कात राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, २५ मार्चपासून नालेसफाई सुरू झाली असून, आतापर्यंत १२ टक्के गाळ काढण्यात आला आहे.
मुंबईत पावसाळापूर्व कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. प्रत्येक अभियंत्याच्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती त्यांना असायलाच हवी, असे आयुक्तांनी नमूद केले. कामाची सद्यस्थिती, तेथील आव्हाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर आताच तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
दरम्यान, या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. प्रत्येक अभियंत्याने कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि हातातील कालावधी या त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
‘मोबाइल पंप सज्ज ठेवा’
सखल भागांमध्ये पाणी उपशासाठी पालिका पंप बसविणार आहे. हे पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून तेथे पालिकेचा कर्मचारी तैनात करावा.
काही मोबाइल पंप सज्ज ठेवावेत. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास तेथे मोबाइल पंपाद्वारे पाणी उपसा करावा. पंपामध्ये सातत्याने बिघाड झाला तर पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.
यंदाच्या पावसाळ्यात जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हवामान विभागातर्फे जेव्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल, अशावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यस्थळी हजर राहावे, असेही आयुक्तांनी सांगितले.