Join us

मुंबईकरांची वीज स्वस्त; राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 2:21 AM

महावितरण कृषीपंपांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्यासाठी क्रॉस सबसिडी आकारते. मुंबईत बेस्ट वगळता अन्य दोन कंपन्यांकडे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची श्रेणी नाही.

संदीप शिंदे मुंबई : राज्यात सर्वात स्वस्त वीज ही मुंबईकरांना मिळत असल्याची माहिती हाती आली आहे. बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांमार्फत मुंबईला पुरवली जाणारी वीज ही उर्वरित राज्यात वीज पुरवणाऱ्या महावितरणच्या तुलनेत किफायतशीर असल्याचे नुकताच प्रसिद्ध झालेला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो.

० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या मुंबईतील ग्राहकांना टाटा, बेस्ट आणि अदानी या कंपन्या प्रति युनिट अनुक्रमे १ रुपये १९ पैसे, ३ रुपये २४ पैसे आणि ५ रुपये ६ पैसे दराने वीजपुरवठा करतात. महावितरण कंपनीचे वीज ग्राहकांसाठीचे दर ५ रुपये १८ पैसे आहेत. सर्वाधिक घरगुती ग्राहक याच गटात मोडतात. १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरास महावितरण ९ रुपये ३६ पैसे आकारत असताना मुंबईतल्या कंपन्यांचा सरासरी दर ६ रुपये ६५ पैसे इतका आहे. ३०१ ते ५०० युनियनसाठी ही आकारणी अनुक्रमे ११ रुपये ६५ पैसे आणि ९ रुपये १७ पैसे आहे.

व्यावसायिक आणि लघुदाब अनिवासी ग्राहकांसाठी तीन वेगवेगळ्या गटांमध्ये महावितरण सरासरी १३.७९ दराने वीजपुरवठा करते. तर, टाटा (९.२७), अदानी (१०.१७) आणि बेस्टचे (८.११) दर त्यापेक्षा कमी आहेत. उद्योगांसाठी पुरविल्या जाणाºया विजेबाबतही तीच परिस्थिती आहे. केवळ सार्वजनिक दिवाबत्ती, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना महावितरणतर्फे पुरवली जाणारी वीज ही मुंबईतल्या विजेपेक्षा स्वस्त आहे.महावितरणची वीज देशात महागडीमहावितरण कृषीपंपांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्यासाठी क्रॉस सबसिडी आकारते. मुंबईत बेस्ट वगळता अन्य दोन कंपन्यांकडे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची श्रेणी नाही. महावितरण २ रुपये ८ पैसे सवलतीत त्यांना वीज देते. मुंबईत तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याने दर नियंत्रणात दिसतात. तर, महावितरणला राज्यभरात स्पर्धकच नाही. ढिसाळ व्यवस्थापन, सरकारी हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार यामुळे महावितरणची वीज राज्यातच नव्हे तर देशात सर्वात महागडी असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

टॅग्स :वीज