मुंबईच्या मनोरंजन कराला गळती!
By admin | Published: August 19, 2015 02:27 AM2015-08-19T02:27:36+5:302015-08-19T02:27:36+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मनोरंजन करात घट होत असताना देशी व्यावसायिक स्पर्धांना सरकार अभय देत आहे. कोट्यवधी रुपयांची
चेतन ननावरे, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मनोरंजन करात घट होत असताना देशी व्यावसायिक स्पर्धांना सरकार अभय देत आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या स्पर्धांमध्ये विदेशी कंपन्या गब्बर होत असून सरकार मात्र महसुलाअभावी कंगाल होताना दिसत आहे. त्यामुळे नव्या पर्यायांचा सरकार विचार करणार का, असा सवाल उपस्थित होतो.
आयपीएलच्या धर्तीवर राज्यात फुटबॉल, टेबल टेनिस, कबड्डी आणि आता कुस्तीची व्यावसायिक स्पर्धा भरणार आहे. मात्र क्रिकेटचे एकदिवसीय सामने आणि आयपीएल स्पर्धा वगळता इतर स्पर्धा अद्याप मनोरंजन कराच्या कक्षेत आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक तिकिटावर आकारण्यात येणाऱ्या २५ टक्के मनोरंजन कराचा वाटा शासनाला गमवावा लागत आहे.
चालू आर्थिक वर्षात मुंबईच्या मनोरंजन करवसुलीचे उद्दिष्ट ११० कोटी ठेवण्यात आले आहे. मात्र एप्रिल ते जून या गेल्या तीन महिन्यांत केवळ १७ कोटी ६७ लाख ६३ हजार रुपये म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या १६.०७ टक्के इतकाच महसूल गोळा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या ९ महिन्यांत सुमारे ८४ टक्के महसूल गोळा करण्याचा प्रयत्न प्रशासनाला करावा लागणार आहे.