मुंबईचा चेहरामोहरा बदलणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:33 AM2018-09-25T05:33:00+5:302018-09-25T05:33:13+5:30
कोस्टल रोड, सी-लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या तीन वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केले.
मुंबई : कोस्टल रोड, सी-लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या तीन वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केले. भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या ३३.५ किमीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
शासनाने मेट्रोचे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो-३ च्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
आम्ही मुंबईला आधुनिक शहर म्हणून उभे करणार आहोत. शांघायचे नागरिकही २१ व्या शतकातील चांगले शहर म्हणून मुंबई पाहायला येतील. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून सर्वांसाठी एकच तिकीट प्रणाली विकसित होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेले प्लॅटफॉर्म उत्तम आहे. निती आयोगाची टीम ते पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर देशात ही प्रणाली लागू होऊ शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.